शरद पवार गेल्याची दुःखद बातमी आली अन्…’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचे शिवसैनिकासाठी भावनिक पत्र

Maharashtra Today

मुंबई :- शिवसेनेचे कार्यकर्ते शरद पवार (Sharad Pawar) हे ‘शिवसेना दैनंदिनी’ चे प्रणेते होते. निष्ठावंत शिवसैनिक शरद पवार यांचं शुक्रवारी कोरोना आजाराने निधन झाल्याची बातमी आहे.

त्यांच्या अचानक जाण्यानं शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पवार शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्या जवळचे मानले जात होते. अरविंद सावंत यांनी शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक भावनिक पत्र लिहिले आहे. सध्या या पात्राची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

शरदचा चटका लावणारा अस्त ! आमच्या लोकाधिकारचा एक तारा शरद पवार गेल्याची दुःखद बातमी आली आणि मी निःशब्द झालो. गेली अनेक वर्षे हा साहेबांचा कडवट शिवसैनिक लोकाधिकारच्या चळवळीत झोकून देऊन काम करत होता. पण शरद पवार आणि जी एस यांनी स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आणि ती शिवसेना दैनंदिनीची, असं अरविंद सावंत यांनी पत्रात लिहिले आहे.

अलीकडच्या काळात माझ्या कार्यालयात अनेकदा येऊन गेला. शरद एकदा त्याच्या चिरंजीवाला घेऊन आला. म्हटलं काय काम आहे का? नाही साहेब, तुमचा फॅन आहे म्हणून घेऊन आलो. माझ्याकडून काही योग्य घडलं, किंवा चांगला प्रतिवाद करताना दूरदर्शन वर पहिले की त्याचा फोन आलाच. असा हा शरद…’, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे .

कोरोनात (Corona) सारे कुटुंबच अडकले आहेत. पत्नी आणि तो एकाच हॉस्पिटलमध्ये होते. पण ती गेल्याचा मागमुसही त्याला नव्हता. काल परवा सेव्हन हिल हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा त्याचा मुलगा भेटला. मला वाटले आता शरद नक्की बरा होऊन घरी येईल. पण कसचं काय आणि अखेर आज तोही सोडून गेला तेही अक्षय तृतीयेला!, शिवसेनाप्रमुखांच्या एका निष्ठावंत शिवसैनिकांचा शरीररूपी क्षय झाला पण अक्षय स्मरणात राहील, असेही सावंत यांनी पत्रात म्हटले आहे .

 

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button