आघाडीत बिघाडी! शिवसेना आमदाराने राष्ट्रवादीच्या खासदाराविरोधात मांडला हक्कभंग प्रस्ताव

sunil-tatkare-yogesh_kadam

रत्नागिरी : राज्यात शिवसेना(Shivsena), राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार (MVA) असलं तरी स्थानिक पातळीवर अद्यापही तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं उघड होत आहे. कोकणात महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे आमदार आणि रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana patole)यांच्यासमोर हक्कभंग प्रस्ताव सादर केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आपल्या मतदारसंघात विविध कामांच्या कार्यक्रमाला निमंत्रण न देता सुनील तटकरेंकडून परस्पर उद्घाटनं केली जातात. कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नाही, उद्घाटनाच्या पाटीवर स्थानिक आमदार म्हणून आपले नाव येत नसल्याची खंतही योगेश कदम यांनी व्यक्त केली. योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पत्राद्वारे सुनील तटकरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव पाठवला आहे.

12 ऑक्टोबरला तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम एक कार्यक्रम झाला होता. त्यानंतर शिवसेनेनं तटकरेंविरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. १२ ऑक्टोबर रोजी मला निमंत्रण न देता पंचायत समिती सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. रायगड व रत्नागिरी जिल्हा जोडणारा आंबेत पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मी प्रयत्न केले. राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत बैठका घेतल्या. म्हाप्रळ ते आंबेत फेरी बोट सेवा सुरु करण्यासाठी जेटीचे बांधकाम करण्यासाठी शासकीय निधी मंजूर झाला. मात्र या कामाचं वर्क ऑर्डर न काढताच खासदार सुनील तटकरे, त्यांचे चिरंजीव आमदार अनिल तटकरे आणि माजी आमदार संजय कदम यांना घेऊन कामाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाचे निमंत्रण मला दिले नाहीत, तसेच याठिकाणी लावण्यात आलेल्या पाटीवरही स्थानिक आमदार म्हणून माझं नाव टाकलं नाही. खासदारांनी राष्ट्रवादी पक्षाचा भूमिपूजन कार्यक्रम केला असा आरोप त्यांनी केला. खासदार सुनील तटकरे यांच्या उद्घाटनाच्या फोटोनंतर सेना आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत काही आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळतंय.

ही बाब अतिशय गंभीर असून, माझ्या हक्कावर गदा आणण्याचे काम सातत्याने खासदार सुनील तटकरे करीत आहेत. त्यामुळे नाइलाजाने आपण २० ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला असल्याची माहिती योगेश कदम यांनी दिली आहे. सुनील तटकरे यांच्यावर पुढील योग्य कारवाई करण्याची विनंती पत्राद्वारे कदम यांनी केली आहे. या सर्व प्रकारामुळे आता महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दापोली पंचायत समितीत जी बैठक झाली, त्यात स्थानिक आमदार योगेश कदम उपस्थित का नाहीत? अशी विचारणा केली असता पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते या बैठकीला येणार नसल्याचं खासदार सुनील तटकरेंनी तेव्हा पत्रकारांना सांगितले होते. जिल्हा आणि स्थानिक पातळीवर तिन्ही राजकीय पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही तटकरे म्हणाले. येत्या काही दिवसात महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कामे मार्गी कशी लावायची हे ठरवू असंही सुनील तटकरेंनी सांगितले आहे.

ही बातमी पण वाचा : अजित दादा नाराज नाहीत, सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसेंची करवून दिली भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER