राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी देतात तर आम्हाला ताटकळत ठेवले जाते ; शिवसेना आमदारांनी मांडल्या मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा

CM Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या आहेत .. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांचे निधीबाबत लाड होतात. आम्हाला ताटकळत ठेवले जाते. एखाद्या योजनेंतर्गत कामे देताना त्यांना झुकते माप दिले जाते, असा सूर या बैठकीत शिवसेना आमदारांनी लावला.

मुख्यमंत्री ठाकरे सध्या शिवसेना आमदारांच्या विभागनिहाय बैठकी घेत आहेत. सोमवारी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांशी त्यांनी संवाद साधला. मतदारसंघासाठी निधी दिला जात नाही, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यादेश काढले जात नाहीत. आपले सरकार असताना कामे होत नाहीत, अशा तक्रारी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या .

राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये निधीबाबत दुजाभाव केला जातो असा सूर काही आमदारांनी लावला. ‘संबंधितांशी बोलून व प्रसंगी आदेश देऊन तुमच्या तक्रारी दूर करेन’ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिले असेही सूत्रांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे (Lockdown) शासनाची आर्थिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे निधीची अडचण असल्याचे आम्ही मतदारांना सांगतो पण बाजूच्या मतदारसंघात कामे होत असतील व आमच्याकडे ती होत नसतील तर काय सांगायचे? अशी कैफियत काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या आमदारांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये मुख्यमंत्री आणि आमदारांनी समोरासमोर बसून मतदारसंघातील प्रश्न, निधीची कमतरता या प्रश्नांबद्दल चर्चा केली, अशी माहिती शिवसेना आमदार आणि प्रवक्ते सुनील प्रभू यांनी दिली .

आज शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनाही मुख्यमंत्री भेटणार आहेत. आमदार हतबल नाहीत, तर संतुष्ट आहेत. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या आमदारांना भेटून त्यांच्या कामाच्या संदर्भातला आढावा घेऊन आवश्यक आदेश देत आहेत, असेही सुनील प्रभू यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER