शिवसेनेच्या आमदाराला उपरती; म्हणाले, ‘पवार वडीलधारी, त्यांच्यावर नाराज होण्याचा अधिकार’

Sharad Pawar - Shahaji Patil

सोलापूर : उजनी धरणाच्या पाण्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करणारे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उजनीतून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर पाटील यांना उपरती झाली. शरद पवार हे आमच्यासाठी मार्गदर्शकच असून महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) कुटुंबातील प्रमुख नेते आहेत. सांगोलासारख्या दुष्काळी भागातील सिंचन योजना प्रलंबित असताना इंदापूरसाठी उजनीतून पाणी नेणे योग्य नसल्याने मी तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठीच पवारसाहेबांवर टीका केली होती. मी राजकीय दृष्टिकोनातून टीका केली नसून घरातील माणसांवर रागावणे, टीका करणे हा आमचा अधिकारच आहे, अशी भूमिका सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी मांडली.

उजनी धरणाच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले होते. भाजपने विरोधाची भूमिका घेतलेली असतानाच महाविकास आघाडी प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र सोडत उजनीचे पाणी इंदापूरला नेल्यास सोलापूर जिल्ह्यात रक्तरंजित आंदोलन होईल, असा इशारा दिला होता. तसेच, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या विचाराचे सरकार राज्यात ज्या ज्या वेळी आले, तेव्हा तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचा विकास केलेला आहे. बारामतीला सगळा निधी मिळवून द्यायचा आणि बारामती हे विकास मॉडेल आहे, असे देशभर सांगायचे, ही पवारांची राजकीय पद्धत आहे, अशीही टीका आमदार पाटील यांनी केली होती.

पवारांवर केलेल्या टीकेमुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यात शहाजी पाटील यांची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्यांच्या पक्षातीलच एका आमदाराने शरद पवारांवर टीका केल्यामुळे विरोधकांच्याही भुवया उंचावल्या होत्या. परंतु इंदापूरसाठी उजनीतून जाणाऱ्या पाण्याचा आदेश जलसंपदा विभागाने रद्द करताच शहाजीबापू पाटील यांनी नरमाईची भूमिका घेतली.

गेल्या अनेक वर्षांपासून दोन टीएमसी पाण्यासाठी सांगोल्याची जनता तहानलेली आहे. येथील अनेक प्रश्न प्रलंबित असताना दुष्काळी सांगोल्यातील पाणीप्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते. शरद पवार खासदार असतानाच त्यांनी या प्रलंबित योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून योजना पूर्ण करणे महत्त्वाचे होते. परंतु उजनीचे पाणी इंदापूरला नेल्यामुळे तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मी शरद पवारांवर टीका केली होती. सांगोल्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मी अशी भूमिका घेतली होती. परंतु पवारसाहेब हे महाविकास आघाडीचे प्रमुख असल्याने आमच्यावर झालेल्या अन्यायासाठी टीका-टिप्पणी करणे हा माझा अधिकारच आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांनी सर्वसमावेशक राजकारण करण्याची गरज असल्याचेही शेवटी आमदार पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button