
मुंबई :- शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आपल्या मतदार संघात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार असल्याचे म्हटले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा आपला मानस आहे. या स्मारकाच्या माध्यमातून जाणत्या राजाचा इतिहास जगासमोर यावा यासाठी या विषयाशी संबधीत सर्व घटकांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. या संदर्भात चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत मार्गदर्शन करतांना सत्तार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या वीर लढवय्या राजांच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीला मिळत रहावी यासाठी हे स्मारक महत्वपुर्ण ठरणार आहे. महाराजांचे युद्धकौशल्य, सुराज्य, अष्टप्रधान मंत्रीमंडळ, त्यांची हस्तलिखीते, शस्त्रास्त्रे असे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जीवंत करणारे साहित्य एकाच ठिकाणी पर्यटकांना बघायला मिळणार आहे. हे स्मारक सर्व दृष्टीने परिपुर्ण असावे यासाठी इतिहास संशोधक, लेखक, वास्तुकला, शिल्पकार या सगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.
हे स्मारक दहा एकरच्या परिसरात उभारले जाणार असून पहिल्या टप्प्यात रुपये २१ कोटींचा निधी लागणार आहे. या प्रकल्पाच्या भविष्यातील देखभाल दुरुस्तीसाठी खासगी संस्थांकडून सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत मिळणारा निधी वापरण्यात येईल, त्याच प्रमाणे स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या निधीतील १० टक्के निधी या कामासाठी राखून ठेवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले.
या स्मारकाच्या ठिकाणी दृकश्राव्य माध्यमाचा जास्तीत जास्त वापर व्हावा असे मत माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले, शिवाजी महाराजांवरील साहित्याची अभ्यासिका असावी असे मत लेखक जाधव यांनी मांडले, मुर्तीकार कांबळे यांनी दगडी मुर्ती असावी असे सूचविले, प्रा. बाणगुडे पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या अचर्चित कार्यावरील शिल्पे उभारण्यावर भर द्यावा असे सुचवले. तर देशपांडे यांनी शिवाजी महाराजांवरील चित्रपट तयार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत खासदार डॉ. कोल्हे यांनी याच स्मारकाच्या धर्तीवर त्यांच्या मतदार संघ जुन्नर येथे उभारण्यात येणा-या ‘शिवसंस्कार सृष्टी’ या प्रकल्पाचे दृकश्राव्य सादरीकरणही केले.
ही बातमी पण वाचा : लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरालाच टाळे लावले! ही कसली लोकशाहीची रीत? – शिवसेना
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला