शहापूरमध्ये शिवसेनेला खिंडार; शेकडो शिवसैनिक मनसेत

Shivsena & MNS

रायगड : गेल्या काही दिवसांत राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढते आहे. शहापूर तालुक्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला.

लॉकडाऊनच्या काळात जनता विविध समस्यांनी त्रस्त आहे. शहापूर तालुक्यात शिवसेनेचे तालुका नेतृत्व जनतेचे प्रश्न सोडवण्यात कमी पडते आहे. शहापूर तालुक्यात अनेक शिवसैनिक नाराज आहेत, असा दावा अविनाश जाधव यांनी केला.

कल्याण-डोंबिवलीतील सेना-भाजपा कार्यकर्तेही मनसेत
गेल्या महिन्यात कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपामधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.

शिवसेना-भाजपाचे सुमारे शंभर कार्यकर्ते मनसेत आल्याने कल्याण-डोंबिवली मनसेत चैतन्य निर्माण झाले आहे. शिवसेना – भाजपाला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडले आहे.

त्याआधी, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील वरळीतील एनजीओ, सार्वजनिक मंडळे यांचे कार्यकर्ते आणि काही सामान्य नागरिकांनी मनसेत प्रवेश केला.

औरंगाबादेतील निष्ठावान शिवसैनिक मनसेत
औरंगाबाद, मुंबई, पुणे अशा विविध भागांत कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागांतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पाठोपाठ खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेत प्रवेश केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER