आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजू नये – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

पुणे :- आम्ही शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार उघड केला ते भाजपला महाराष्ट्रद्रोही असल्याचे सांगत आहेत. मात्र, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजू नये. कोणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. आम्ही पण महाराष्ट्रातीलच नेते आहोत, आम्हालाही राज्याच्या अस्मितेचे भान आहे. आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याला महाराष्ट्रद्रोही म्हणायचं, अशी शिवसेनेची कार्यपद्धती आहे, अशी टीका, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी झाली, असा आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचाही समाचार घेतला. पराभव दिसत असल्याने जयंत पाटील (Jayant Patil) असे विधान करत आहेत. हे वक्तव्य म्हणजे त्यांनी आपला पराभव मान्य केल्याचे संकेत आहेत. या निवडणुकीत ईव्हीएम यंत्रावर खापर फोडता येणार नाही म्हणून आता जयंत पाटील यांनी बोगस मतदारनोंदणीचा मुद्दा उकरून काढला आहे. आपण निवडणूक हारणार, याची जाणीव असल्याचे त्यांनी आतापासूनच कव्हर फायरिंग सुरु केली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तसेच पुणे पदवधीर मतदारसंघात भाजपच्या संग्राम देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित आहे. भाजपने चांगली नोंदणी केली आहे. कार्यकर्ते उत्साहाने काम करत आहेत. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच संग्राम देशमुख विजयी होतील, असा दावा फडणवीस यांनी केला.

महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्याविरोधात असंतोष आहे. महाविकासआघाडीतील कुरघोडीच्या राजकारणात सामान्य जनता भरडली जात आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर आपला रोष व्यक्त करतील, अशी अपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

आम्हाला आनंद आहे की किमान पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरती तरी त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आहे असं म्हणत आम्हाला आनंद झाला. आजपर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रं पाठवली, सल्ले दिले. पण यापैकी एका पत्राचीही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दखल घेतली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून केवळ वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे केवळ मराठाच नाही, तर सार्‍याच समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले जात आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रारंभीपासून सरकारने लक्षच दिले नाही,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

ही बातमी पण वाचा : पुणे पदवीधर मतदारसंघ : राष्ट्रवादीने निवडणुकीआधीच मान्य केला पराभव – फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER