राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम, शिवसेनेचा बडा नेता राष्ट्रवादीत

सांगली : सांगली महापालिकेतील (Sangli mahanagar palika) महापौरपदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपचा (bjp) करेक्ट कार्यक्रम करत सत्तांतर घडवून आणले होते. भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता राष्ट्रवादीने शिवसेनेचाही करेक्ट कार्यक्रम उरकून टाकला. कारण शिवसेना नेते, माजी नगरसेवक शेखर माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेशाचा करेक्ट कार्यक्रम उरकण्यात आला. महापालिका निवडणुकीच्या आधी माने यांनी शिवबंधन हातात बांधले होते. आता त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत हातात घड्याळ बांधून घेतले आहे. महापौर निवडीच्या “करेक्‍ट कार्यक्रमात’ त्यांचा सक्रिय सहभाग होता, हे विशेष.

शेखर माने यांनी याआधी कॉंग्रेस व राष्ट्रवादीत दिवंगत नेते मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. महापालिकेत ते दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी उपमहापौर, गटाचे नेते म्हणून त्यांनी काम पाहिले होते. या काळात पक्षाविना दबावगट स्थापन करण्याचा वेगळा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला होता. महापालिकेच्या स्थापनेपासून सांगलीच्या राजकारणात, समाजकारणात त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला त्यांचा फायदा होईल, महापौर निवडीत त्यांनी केलेले काम उपयुक्त ठरले, असे कौतुक जयंत पाटील यांनी यावेळी केले.

गेल्या तीन वर्षांपासून ते शिवसेनेचे नेते म्हणून कार्यरत होते. शहरातील युवा मंडळाचे नेतृत्व करत त्यांनी युवकांची मोठी फौज उभी केली आहे. त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने शिवसेनेला मात्र जबर धक्का बसला आहे. लवकरच माने यांच्या माध्यमातून शहरातील अनेक मंडळांचे युवक आणि शिवसेनेतील एक गटही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. सांगली शहराच्या विकासासाठी आजवर आम्ही राबलो आहे. आताही राष्ट्रवादीत प्रवेशामागे शहर विकासाचाच उद्देश आहे. शिवसेनेत कोणत्याही पदाविना मी कार्यरत राहिलो. तिथेही अपेक्षा केली नाही. राष्ट्रवादीतही शहरासाठी आवश्‍यक असलेली कामे व्हावीत, हीच अपेक्षा घेऊन आलो आहे, असे माजी नगरसेवक, शिवसेना नेते शेखर माने यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER