शिवसेना नेते महेश कोठे आज राष्ट्रवादीत, पक्षप्रवेशाआधी पवारांशी भेटणार

Sharad Pawar - Mahesh Kothe

मुंबई :- सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (Shiv Sena) नगरसेवक महेश कोठे (Mahesh Kothe) हे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रवादी प्रवेशासाठी महेश कोठे मुंबईकडे रवाना झाले असून, त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही सोबतीला आहेत. पुण्यात पोहचेपर्यंत शरद पवारांच्या (Sharad Pawar) कार्यालयातून त्यांना आधी शरद पवारांसोबत भेट घेण्याचा निरोप देण्यात आला.

महेश कोठे पंचवीस लोकांसोबत आज सकाळी ११ वाजता शरद पवारांना भेटणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये सकाळी 11 वाजता भेटीनंतर सार काही चित्र होणार स्पष्ट होईल असे सांगितले जात आहे. मात्र महेश कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा अंतिम निर्णय घेतला असल्याने, त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे.

दुसरीकडे, महेश कोठे हे सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर कुठला निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वी अहमदनगरच्या पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते. तेव्हादेखील अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता. तेव्हा उद्धव ठाकरे प्रचंड संतापले होते.

यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अजित पवार यांना फोन करून निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार (Ajit Pawar) यांना धाडला होता. अखेर या बंडखोर नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर येऊन हातात पुन्हा शिवबंधन बांधले होते.

मात्र, सोलापुरात (Solapur) महेश कोठे बऱ्याच दिवसांपासून नाराज असल्याने तडजोड होण्याची शक्यता कमी आहे. आपल्या नेतृत्वाखाली सोलापुरात शिवसेनेची ताकद वाढली. मात्र, विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी पत्ता कट झाल्यामुळे कोठे नाराज होते. त्यामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीत जायचे असा निर्धार केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांकडून मंत्र्यांचा क्लास, मंत्र्यांकडून जाणून घेतला कामांचा लेखाजोखा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER