ठाण्यात शिवसेनेचा नवा उपक्रम, कोरोना रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन बॅंक’चा शुभारंभ

Eknath Shinde - Oxygen Bank Scheme

ठाणे : कोरोनाबाधित (Corona) रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता भासू लागली आहे. अश्यावेळी रुग्णालयात बेड मिळेपर्यंत या रुग्णांना तातडीने घरच्याघरी ऑक्सिजन (Oxygen) मिळावा, यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ऑक्सिजन बॅंक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

एमएमआर रीजनमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. ही गरज लगेचच्या लगेच भरून काढता येणे शक्य नाही. अनेकदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत त्यांची तब्येत खालावते. अशा गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी शिंदे यांनी या ऑक्सिजन बॅंकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑक्सिजन बँकेत सुरुवातीला पाच लिटर क्षमतेचे १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येणार असले तरी कालांतराने १० लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन्सद्वारे हवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन त्यातील नायट्रोजन वेगळा करुन रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय कक्ष यांच्या माध्यमातून ही सेवा ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. शिवसेनेचा हा उपक्रम निश्चितच पथदर्शी ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच गरजू कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी या ऑक्सिजन बँकेचा लाभ घेण्यासाठी शिवसेना वैद्यकीय कक्ष कार्यालय, मंगला हायस्कूल शेजारी, कोपरी ठाणे पूर्व येथे संपर्क साधावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले. प्रसंगी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, शिवसेना (Shiv Sena) वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button