गोकुळ निवडणुकीत शिवसेना ठरेल किंगमेकर; काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची मातोश्रीवर फिल्डिंग

CM Uddhav Thackeray-Matoshree

कोल्हापूर : महाराष्ट्रात सर्वात मोठा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ संघाची निवडणूक (Gokul’s election) चांगलीच चुरशीची होणार आहे. थेट शेतकऱ्यांशी संबंधित असलेला हा संघ आपल्या ताब्यात असावा यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र आता या निवडणुकीत शिवसेनेने उडी घेतल्याने सत्ता मिळवून देण्यासाठी शिवसेना किंगमेकर ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’वर जोरदार फिल्डिंग लावली असल्याची माहिती पुढे आली आहे.

गाय-म्हैशीच्या दूधाला योग्य भाव मिळाला पाहिजे. दूध उत्पादक खऱ्या अर्थाने गोकुळ संघाचा मालक झाला पाहिजे. शेतीसोबत दूग्ध व्यवसायही शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय झाला पाहिजे, यासाठी जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

दरम्यान, महाडिकांच्या ताब्यात असलेल्या गोकुळ दूध संघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः सतेज पाटील त्यासाठी अधिक प्रयत्नशील आहेत. गोकुळ दूध संघावरील महाडिकांचे संस्थान खालसा करण्याचे त्यांचे पुरजोर प्रयत्न आहेत. त्यासाठी त्यांनी थेट मातोश्री’वरून फिल्डिंग लावण्याची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे गोकुळच्या आखाड्यात या वेळी कॉंग्रेसचे नेते तथा पालकमंत्री सतेज पाटील(Satej Patil) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना शिवसेनेची ताकद मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

पाटील म्हणाले, गोकुळ खऱ्या अर्थाने उत्पादकांच्या मालकीचा व्हावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीला पर्यायी म्हणून असणारा दूग्ध व्यवसायही प्रमुख व्यवसाय कसा होईल, याकडे लक्ष दिले जाईल. सर्वांना एकत्रित घेवूनच गोकुळ दूध संघाची निवडणूक लढली जाईल. आत्तापर्यंत शेतकरी गोकुळच्या लाभापासून वंचित राहिला आहे. गोकुळ नफ्यातील जास्ती-जास्त वाटा दूध उत्पादक सभासदांना मिळालाच पाहिजे, असा आपला आग्रह आहे. महाविकास आघाडीकडून हेच काम प्रामाणिकपणे केले जाईल, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.

रम्यान, शिवसेना गोकुळच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. जिल्हांतर्गत सर्व शिवसेना नेते, कार्यकर्त्यांकडूनही तशी तयारी केली जात आहे. गोकुळबाबत मातोश्रीवर जो निर्णय होईल, तो सर्वांना मान्य असणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, त्यानुसार गोकुळच्या निवडणूक रिंगणात उतरले जाईल, अशी माहिती शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER