शिवसेना हिंदुत्ववादी नसून तडजोडवादी, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

CM Uddhav Thackeray - Narayan Rane

मुंबई : पालघर साधू हत्याकांडाचा तपास योग्य पद्धतीने झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. तसेच राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) हे हिंदुत्ववादी सरकार नसून हे तडजोडवादी सरकार आहे, असा जोरदार घाणाघातही त्यांनी केला.

पालघर साधू हत्याकांडप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी खार ते पालघर जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र, ही यात्रा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी कदम यांना ताब्यात घेऊन खार पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर कदम यांची भेट घेण्यासाठी राणे खार पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी मध्यस्थी करत राम कदम यांची सुटका केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

कोरोना (Corona) संकटाच्या काळात अशा प्रकारचं आंदोलन करू नका अशी विनंती पोलिसांनी राम कदम यांना केली होती. त्यामुळे कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, असं सांगतानाच पालघर प्रकरणी राज्य सरकारने हवी त्या पद्धतीने चौकशी केली नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं आहे, असं राणे म्हणाले.

आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलं होतं. त्याचा नारायण राणे यांनी जोरदार समाचार घेतला. मुख्यमंत्री कोणत्याच परीक्षेला बसले नाहीत. पिंजऱ्यात बसून आहेत. त्यांनी कामच केलं नाही. मग सर्टिफिकेट कसं देणार?, असा टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असं मी म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. हे तर तडजोडवादी आहेत. गद्दारी करून शिवसेना सत्तेत आली. पदासाठी त्यांनी तडजोड केली, राज्यातील विकास कामे ठप्प आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी एकही काम केलं नाही. घरातच बसून असतात. पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत. ठाकरे कोणत्याही परीक्षेला बसले नाहीत. बसत नाहीत. त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, असा टोला राणे यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER