शिवसेना अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही ; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांचे सुचक विधान

Sudhir Mungantiwar & Uddhav Thackeray

बाळासाहेबांनीही युतीत सडलो म्हणत युती तोडली होती, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे चिरंजीव आहेत, ते सोनिया गांधींच्या दबावाखाली येणार नाहीत.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय गर्भात अजून पुन्हा काही शिजतंय का असा संशय आता अनेकांना यायला लागला आहे. भाजपकडून शिवसेनेसाठी नरमाईची भूमिका काही संकेत देत आहेत. आज भाजपचे नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुनगंटीवार यांनी शिवसेना – मनसे युतीबाबत आश्वासक विधान केले आहे.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर हे दोन्ही नेते भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच काळ चर्चा झाल्याचे सांगितले जाते. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, माध्यमांशी बोलतांना मुनगंटीवार यांनी युतीबाबत सुचक विधान केले आहे.

आजच्या भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची आहे, त्यांनी ती करू द्या. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये नक्की शिजतंय तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

त्याचप्रमाणे मुनगंटीवार यांनी युतीबाबतच्या बाळासाहेबांच्या विधानाचाही दाखला देत म्हणाले, उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, ते सोनिया गांधींच्या दबावाखाली येणार नाहीत, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत. कधीकाळी युतीमध्ये सडलो, म्हणत युती तोडली, पण नंतर परत सोबत आले, आता पुढे बघू, असं मुनगंटीवार म्हणाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, या भेटीत माझ्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळाबाबतही आमच्यात बोलणी झाली, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER