औरंगाबाद नामांतरावर शिवसेना ठाम, आता विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव द्या; मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

CM Uddhav Thackeray

मुंबई : औरंगाबादच्या नामातरांचा विषय ताजा असतानाच आता औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्राकडे केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत अधिसूचना लवकरात लवकर काढावी, असे मुख्यमंत्री पत्रात म्हणाले आहेत.

“औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी.” अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध केला आहे. तर शिवसेना नामांतरावर ठाम आहे.

मुंबई सेंट्रलचं  नाव बदलण्यासाठी केंद्राची कार्यवाही

मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. त्यावर आता केंद्र सरकारनं कार्यवाही सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. तसं पत्रच केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पाठवलं आहे. त्यावर “गेल्या सहा वर्षांपासून आपण पाठपुरावा करत होतो. अमित शहा यांना पत्र लिहून त्यात राज्य सरकारनं प्रस्तावाला मंजुरी दिल्याचं सांगितलं होतं. केंद्राकडून प्राथमिक मान्यता मिळायला हवी होती. ती मिळाली नसल्याचं त्यांना पत्राद्वारे सांगितलं होतं. त्यावर मंगळवारी राज्यमंत्र्यांनी पत्र पाठवून प्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलं आहे. आता आपण वाट पाहात आहोत. फेब्रुवारीत जयंतीपूर्वी मंजुरी मिळावी. ” अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER