शिवसेना जातेय बिहारला पण धनुष्यबाण मात्र….

जदयु - शिवसेना - संजय राऊत

शिवसेनेने (Shiv Sena) बिहार (Bihar) विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय अखेर घेतला आहे. पक्षाचे नेते खा.संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी बोलताना त्याची पुष्टी केली पण बिहारमध्ये शिवसेनेची एक पंचाईत झाली आहे. त्यांना निवडणूक तर लढविता येईल पण धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार नाही. कारण, बिहारमध्ये सत्तारुढ असलेल्या जनता दल युनायटेडचे निवडणूक चिन्ह धनुष्य आहे आणि धनुष्याचा समावेश असलेले कोणतेही अन्य चिन्ह इतर पक्षास देऊ नये, अशी मागणी जदयुने निवडणूक आयोगाकडे केलेली होती आणि ती आयोगाने मान्य केली आहे. जदयुने शिवसेनेच्या भीतीने वा चिन्हाच्या सारखेपणामुळे आयोगाकडे दाद मागितलेली नव्हती. जदयुने दाद मागितली होती ती झारखंड मुक्ती मोर्चासंदर्भात. झारखंड हे बिहारचे शेजारील राज्य आहे आणि झारखंड मुक्ती मोर्चा त्या ठिकाणी सत्तारुढ आहे. या मोर्चाचे निवडणूक चिन्ह आहे, धनुष्यबाण. झारखंड मुक्ती मोर्चा बिहारमध्ये काही जागा लढवितो हे लक्षात घेऊन जदयुने खबरदारीचा उपाय म्हणून आधीच आयोगाकडे दाद मागितली आणि आयोगाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामत: आता झारखंड मुक्ती मोर्चा वा शिवसेनेला धनुष्यबाण या चिन्हावर बिहारमध्ये निवडणूक लढता येणार नाही.

शिवसेना बिहारमध्ये ३० ते ४० जागा लढविण्याच्या विचारात आहे. २०१५ च्या निवडणुकीत पक्षाने ८० जागा लढविल्या होत्या आणि एकही जागा जिंकता आलेली नव्हती. सर्व उमेदवारांमिळून केवळ २ लाख ११ हजार मते मिळाली होती. यावेळी पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी खा.अनिल देसाई, खा. प्रियांका चतुर्वेदी आणि खा.संजय राऊत यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती आहे.गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे राजकीय सल्लागार प्रशांतकिशोर हे मुंबईत आले होते आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. शिवसेनेने भाजपच्या बरोबरीने जागा लढवाव्यात आणि आपल्या जास्तीतजास्त जागा निवडून आणाव्यात म्हणजे उद्या चालून भाजपला २०० च्या आसपास जागा मिळाल्या तर इतर मित्रपक्षांकडून नितीशकुमार यांना पंतप्रधान करण्यासाठी दबाव आणायचा अशी प्रशांतकिशोर यांनी व्युव्हरचना होती, असे त्यावेळी बोलले गेले. मात्र, मोदींच्या नेतृत्वात एकट्या भाजपनेच ३०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आणि एनडीएतील मित्रपक्षांच्या इच्छांवर पाणी फिरले गेले.

सध्यातरी शिवसेनेचे मुख्य लक्ष भाजप आहे. बिहार निवडणुकीत भाजपची मते कशी कमी करता येतील, अशा पद्धतीने काही उमेदवार शिवसेना मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. असे असले तर मुळात शिवसेनेचा बिहारमधील जीव अगदीच छोटा आहे. त्यातच सुशांतसिंह (Sushant Singh Rajput) प्रकरणावरून बिहारी मतदारांमध्ये शिवसेनेबाबत संशयाचे वातावरण असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे बिहारमध्ये भाजपला (BJP) शिवसेनेमुळे फटका बसण्याची शक्यता नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER