शिवसेनेने सागवे भागातील रिक्त पदे भरली; उपविभागप्रमुखांच्या नियुक्त्या

ShivSena Logo

रत्नागिरी/प्रतिनिधी : रिफायनरीला समर्थन दिल्यामुळे शिवसेनेने सागवे विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले होते. ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शिवसेनेच्या सागवे विभागांतर्गत उपविभागप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याची माहिती तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी दिली.

गेले काही दिवस रिफायनरी प्रकल्पावरुन सागवे विभाग शिवसेनेत संघर्ष पेटला आहे. शिवसेनेतील हे अंतर्गत भांडण चव्हाट्यावर आले असून वरीष्ठ पातळीवरुन सेनेची त्या विभागाची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी माजी सभापती कमलाकर कदम यांची सागवेच्या विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आता सेनेकडून काही उपविभाग प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये अणसुरेचा कार्यभार राजन कोंडेकर, सागवे, कात्रादेवी परिसरासाठी नारायण गावकर तर अनिल नाणारकर यांच्याकडे नाणार परिसराचे उपविभाग प्रमुख म्हणून कार्यभार सोपविण्यात आला आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ स्तरावरुन या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. लवकरच या विभागातील सर्व शाखाप्रमुखांच्याही नियुक्त्या केल्या जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी दिली.