शिवसेना दसरा मेळावा : सायंकाळी ७ वाजता उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार

CM Thackeray

मुंबई :- शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही परंपरा शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली अखंड सुरू आहे. कोरोनाचे संकट असले तरी यंदाही त्याच उत्साहात शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा (Dussehra Melawa) रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नसून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात संपन्न होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकास आघाडीचे (MVA) सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये या मेळाव्याचा प्रचंड उत्साह आहे. पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात याकडे शिवसैनिक तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. परंपरेप्रमाणे या मेळाव्यात शस्त्रपूजन होईल. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सायंकाळी ७ वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. सोबतच शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत हेही शिवसैनिकांशी संवाद साधतील, अशी माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी दिली.

कोरोना संकटकाळात नियमांचे पालन करून हा मेळावा पार पडणार असल्याने केवळ ५० जणांना याचे निमंत्रण देण्यात आले आहेत. या मेळाव्याला शिवसेनेचे खासदार आणि निवडक आमदार उपस्थित राहतील. मात्र येथील व्यासपीठावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे होणारे मार्गदर्शन सोशल नेटवर्किंग साइटस् तसेच प्रसारमाध्यमांच्या वाहिन्यांवरून सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात शिवसैनिकांनी आपल्या घरातूनच सहभागी व्हायचे आहे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER