मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिवसेनेत एकमत नाही? शिंदे – सावंतांचे नाव अग्रक्रमी

आमदारांची पसंती उद्धव ठाकरेनंतर एकनाथ शिंदे यांना

Arvind Sawant-Eknath Shinde-Sanjay Raut.jpg

मुंबई : ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?’ या एकाच प्रश्नाभोवती राज्याचे राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून फिरत आहे. त्यानंतर राज्यात नेमके कोणाचे सरकार येणार याभोवती राजकारण फिरत राहिले. महिनाभरानंतर राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच सुटताना दिसत आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, आता शिवसेनेतून मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळवून देण्यासाठी एवढे दिवस एकट्याने खिंड लढवणारे खासदार संजय राऊत यांचे नाव चर्चेत आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदारांनी शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदी असावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, शिवसेनेच्या गोटातून आलेल्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदी अग्रेसर आहे.

तसेच, केंद्रातून मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अरविंद सावंत यांचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी समोर येत आहे. आमदार एकनाथ शिंदे शिवसेनेचे सर्वांत जुने वरिष्ठ नेते आहेत; शिवाय त्यांचे पक्षासाठीचे योगदान, पक्षसंघटन, आमदारांचा पाठिंबा या सर्व बाबतीत वजन आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, अशी इच्छा आमदारांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे अरविंद सावंत यांची मातोश्रीशी एकनिष्ठा, केंद्रातील आणि राज्यातील सरकारचा अनुभव यामुळे सावंतांनाही हे पद देण्यात येऊ शकते. अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे. त्यामुळे शिवसेनेत नेमके मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार हे गूढ अद्याप उकललेले नाही.

५ वर्षांसाठी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण