शिवसेनेतील वाद विकोपाला; अब्दुल सत्तारांबाबत चंद्रकांत खैरे करणार गौप्यस्फोट?

औरंगाबाद :- शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्तार यांना  कॅबिनेट मंत्रिपद हवे होते. त्यामुळेच त्यांनी नाराज होऊन राज्यमंत्रिपदही नाकारले असे सांगण्यात येत आहे. मात्र, या सर्व गोंधळात ख-या अर्थाने औरंगाबाद जिल्हा परिषदेतील राजकारण चव्हाट्यावर आले आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून सच्चे शिवसैनिक चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे आमदार सत्तार यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे सात आमदार अन् सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य असताना अध्यक्षपद काँग्रेसला देण्यावरून सत्तार नाराज झालेत. मात्र शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी  सत्तारांच्या राजीनाम्यावर भाष्य करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सत्तारांनी राजीनामा दिला की नाही याची कल्पना नाही. महाविकास आघाडी झाल्यानेच अब्दुल सत्तार मंत्री झाले. त्यामुळे महाविकास आघाडी राज्याचा विचार करून झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजपच्या नेत्यांकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावरून महाआघाडी सरकारवर जोरदार टीका

त्याचसोबत माझ्यासोबत अब्दुल सत्तार काय बोलले हे सांगेन, ते भयानक आहे. मी कोणाची पर्वा करत नाही, मी संघटनेचं काम करतो. आमच्या नेत्याबाबत कोणी काय बोललं तर सहन करत नाही, असं सांगत चंद्रकांत खैरे यांनी सत्तारांबाबत काय वाद झाला याबाबत सस्पेन्स ठेवला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर आल्याचं बोललं जात आहे.