कोरोना जनजागृतीत शिवसेना नगरसेवकच बेजबाबदार, आयएमएने व्यक्त केली नाराजी

IMA - Shiv Sena

मुंबई : कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची जनजागृती करताना शिवसेनेचे (Shiv Sena) काहीनगरसेवकच बेजबाबदार वागत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने नाराजी व्यक्त केली आहे.

लक्षणानुसार करोनाची औषधे कधी आणि कशी घ्यावीत याची जाहिरातबाजी पक्षाच्या काही नगरसेवकांनी समाजमाध्यमांवर केली आहे. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेणे धोकायदायक असून त्याची अशा रीतीने जाहिरात करणे चुकीचे असल्याचे नोंदवित ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) (Indian Medical Association) आक्षेप घेतला आहे.

शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची जनजागृती करणाऱ्या जाहिराती समाजमाध्यमावर प्रसारित केल्या आहेत. यात करोनावरील लक्षणासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सूचित केलेल्या औषधांची यादी जाहीर केली आहे. जीवनसत्त्व क, ड यांसह हायड्रोक्सीक्लोरोक्विन ही औषधे सर्वांनी घ्यावीत, असे नमूद केले असून दिवस आणि प्रमाणही लिहिले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डेक्सोना गोळी पाच दिवस घ्यावी, असे यात म्हटले आहे. यांसह ताप, सर्दी, घसादुखी असल्यास घ्यावयाची औषधेही लिहिली आहेत.

अतिउत्साहात तयार केलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेली औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे आवश्यक आहे. जाहिरातीत दिलेल्या औषधांचे प्रमाणही चुकीचे आहे. अशा रीतीने जाहिरात केल्यास कोणत्याही सल्ल्याशिवाय औषधे घेण्याच्या चुकीच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळेल आणि याचे व्यापक दुष्परिणाम होऊ शकतात. या औषधांची जाहिरात करणे औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत गुन्हा असल्याने या जाहिराती मागे घेण्याची मागणी ‘आयएमए’ने केली आहे. मुंबईचे माजी महापौर विश्वानाथ महाडेश्वर यांच्यासह माधुरी भोईर, संजना घाडी, सुजाता पाटेकर आदी नगरसेवकांनी या प्रकारची जाहिरातबाजी केल्याची तक्रार आहे.

यासोबतच काही नगरसेवकांनी जाहिरातीत मोठ्या करोना रुग्णालयांना मार्गदर्शन करणाऱ्या खासगी डॉक्टरांचे वैयक्तिक संपर्क क्रमांकही प्रदर्शित केले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनाही याचा त्रास होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी मांडले आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, जाहिरात करणाऱ्या पक्षाच्या नगरसेवकाचा हेतू उदात्त होता, त्यांना केवळ लोकांना जागरूक करायचे होते. पण डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. इतर आजार असलेल्या लोकांसाठी स्वत: ची औषधे धोकादायक असू शकतात, असे आमदार सरनाईक म्हणाले.

आयएमएने यापूर्वी ऑगस्टमध्ये सेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या काही वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदविला होता. त्यावेळी राऊत म्हणाले होते की, ‘डॉक्टरांना काहीच माहित नसते,’ कंपाऊंडर चांगले असतात. मी नेहमीच कंपाऊंडरकडून औषध घेतो, डॉक्टरांकडून कधीच नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER