सत्तास्थापनेचा दावा आज करणार नाही – एकनाथ शिंदे

Eknath Shinde

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिघांची आघाडी करून सरकार स्थापन करण्याबाबत सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे दिल्लीतून जाहीर झाले. आज (शुक्रवारी) मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. त्यानंतर ‘महाविकास आघाडी’विषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती . मात्र आज आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.

शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक आज पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंही घटकपक्षांची बैठक बोलावली आहे. त्यातच त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा पेच सुटण्याच्या मार्गावर आहे. अखेर किमान समान कार्यक्रमावर एकमत झालं असून सत्तास्थापनेचा फॉर्म्युलाही ठरल्याचं सूत्रांनी म्हटलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १५ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळणार आहेत. २१ तारखेला निवडणूक पार पडली आणि २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. मात्र शिवसेनेने पहिल्या दिवसापासूनच आमच्यापुढे पर्याय खुले असल्याची भूमिका घेतली. ज्यामुळे सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला. त्यानंतर सुमारे १९ दिवसांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. आता शिवसेना आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.