मुंबई महापालिकेत शिवसेना – कॉंग्रेस वाद पेटला; काँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला बांधला जात असल्याची टीका

Shivsena-Congress

मुंबई :- मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत आहे म्हणताना पालिकेत पक्षीय राजकारणाला सुरूवात झाली आहे. त्यातच कॉंग्रेसने आम्ही स्वबळावर लढू हे पक्के असल्याचे सांगितल्यानंतर कॉंग्रेस (Congress) – शिवसेनेतील (Shiv sena) वाद आणखीनच वाढत चालला आहे.

आता पालिकेच्या सभांना नगरसेवकांनी अनुपस्थित राहण्यावरून वाद उफाळून आला आहे. पालिकेच्या ऑनलाइन सभेत अनुपस्थित राहिल्यास अपात्र होण्याची वेळ येऊ शकते या स्मरणपत्राने दोन्ही पक्षात गुरूवारी वाद रंगला. पालिकेच्या चिटणीस विभागाने या संदर्भात सात नगरसेवकांना असे स्मरणपत्र पाठवले आहे.

या स्मरणपत्रावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. चिटणीस विभागास हाताशी धरून पालिकेत काँग्रेसला अचडणीत आणले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. तर, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधत विरोधी पक्षनेते रवी राजा ज्या पद्धतीने सत्ताधारी शिवसेनेवर आरोप करत आहेत, माध्यमासमोर बोलतायेत त्यावरून कुठेतरी काँग्रेसला भाजपाच्या दावणीला बांधण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे असा आरोप जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला तसेच,

नेमके प्रकरण काय –
काँग्रेसच्या नगरसेविका कमरजहाँ सिद्दिकी यांनी वैयक्तिक कामासाठी २१ नोव्हेंबर ते डिसेंबर २०२० पर्यंत रजा घेतली होती. १८ऑक्टोबर रोजी त्यांनी तशी माहिती देणारे पत्रही चिटणीस खात्यास दिले होते. पालिकेच्या २७ ऑक्टोबरच्या सर्वसाधारण सभेस सिद्दिकी हजर होत्या. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमधील सभांना त्या हजर नव्हत्या. त्यामुळे ५ जानेवारी रोजीच्या सभेस उपस्थित न राहिल्यास अपात्र ठरु शकाल, असे पत्र चिटणीस विभागाने सिद्दिकी यांना पाठविले.

सिद्दिकी यांनी रजेचा अर्ज दिला असतानाही त्यांचा अर्ज पटलावर न ठेवल्याने त्याची दप्तरी नोंद झालेली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यानंतर त्यांना अपात्र ठरविण्याचा इशारा देणारे पत्र पाठविले गेले. यावरून संताप व्यक्त करत हा प्रकार म्हणजे चिटणीस विभाग स्थायी समितीच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप राजा यांनी केला. त्यानंतर त्याबाबतचे पत्र त्यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना दिले आहे. त्यावर चिटणीस विभागाने भूमिका स्पष्ट करत ही सर्व प्रक्रिया नियमानुसार असून त्यात काहीही गैर नाही. नगरसेवक तीन महिने गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर अपात्र ठरण्याची टांगती तलवार असते. म्हणूनच अशाप्रकारे सात नगरसेवकांना स्मरणपत्र पाठविल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या स्मरणपत्रावरून कॉंग्रेस शिवसेनेतील वाद आणखीनच चिघळला आहे.

एवढेच नाही तर, स्थायी समिती अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेत यशवंत जाधव यांनी पालिकेत काँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला बांधला जात असल्याची खोचक टीका केली आहे.

दरम्यान, ऑनलाईन सभेला अनुपस्थित राहण्याच्या प्रकरणी सेनेच्या दोन, कॉंग्रेसच्या दोन तर भाजपच्या तीन नगरसेवकांना पत्रे दिली आहेत. ही पत्रे देण्यामागे कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER