मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली

मुंबई: मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कोर्टात प्रलंबित असतानाच आता या पदावरून शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसमध्ये (Congress) वाद निर्माण झाल्याचं चित्रं दिसून येत आहे. विरोधी पक्षनेतेपद भाजपच्या वाट्याला जाण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असून या निमित्ताने दोन्ही जुने मित्र जवळ येत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला गेला आहे.

काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो चा नारा दिला आहे. तेव्हापासून काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी घडत आहेत. आता पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद या वादाला कारणीभूत ठरलं आहे. पालिकेत काँग्रेसला दाबण्यासाठी शिवसेनेने नवी खेळी सुरू केल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेसकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपद भाजपला देण्यास शिवसेना तयार झाली आहे. आमच्यावर दबाव टाकण्यासाठी शिवेसेना ही खेळी खेळत असून दोन्ही जुने मित्र या निमित्ताने एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेतेपद मिळावं म्हणून भाजपने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून कोर्टात त्यांची केस सुरू आहे. पण आता याप्रकरणात सेना भाजपला मदत करण्यास तयार झाली असून सेनेच्या या खेळीला आम्ही बळी पडणार नाही, असं रवी राजा यांनी स्पष्ट केलं.

स्थायी समितीत येणाऱ्या प्रस्तावांवरून रवी राजा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. स्थायी समितीत कोणताही प्रस्ताव आला की हा प्रस्ताव वरून आला असं शिवसेना सांगत असते. वरून म्हणजे नेमका कुठून? मंत्रालयातून प्रस्ताव मंजूर करण्याचा आदेश आला की वर्षावरून हे मात्र शिवसेना स्पष्ट करत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. पालिकेच्या प्रस्तावामध्ये मंत्रालयातूनच हस्तक्षेप होत असल्याचा अप्रत्यक्ष दावाच रवी राजा यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER