वाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल

Shiv Sena - BJP Video

वाशिम-यवतमाळच्या (Washim-Yavatmal) शिवसेनेच्या (Shiv Sena) खासदार आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचे भाजप (BJP) आमदार राजेंद्र पाटणी (Rajendra Patni) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. खा.गवळी या पाटणी यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘नाटक नाही पाहिजे मला, लाज वाटते की नाही थोडीशी, माझ्या कामात अडंगा आणला तर मी भावना गवळी (Bhavana Gawali) आहे लक्षात ठेव’ असे या व्हिडिओमध्ये गवळी म्हणत असल्याचे दिसते. प्रजासत्ताक दिनाला जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती. त्या बैठकीत भावना गवळी, शिवसेनेचे विधान परिषद सदस्य गोपीकिसन बाजोरिया हे दोघे एका कक्षात चर्चा करीत होते. तेवढ्यात गवळी बाहेर आल्या. आमदार पाटणी त्या ठिकाणी आले. सोबत त्यांचे काही कार्यकर्तेही होते. यावेळी गुंठेवारीची लोकांची अडकलेली प्रकरणे मार्गी लावण्याच्या विषयावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली असे म्हटले जाते. भावना गवळी यांनी पाटणी यांच्याशी बोलताना सौजन्याची ऐशीतैशी केली असे पाटणी समर्थकांचे म्हणणे आहे. गवळी यांनी वाशिम शहर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत, पाटणी यांनीच आपल्याला धमकावले, तू जिल्ह्यात कशी फिरते पाहतोच असे म्हटल्याचे नमूद केले आहे. पाटणी त्यांची माणसे लावून माझ्यावर, माझ्या सहकाºयांवर हल्ला करायला लावू शकतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध त्वरित गुन्हा दाखल करावा असेही गवळी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दुसरीकडे पाटणी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीसीच्या बैठकीला मी गेलो होतो. त्या ठिकाणी भावना गवळी, आ.गोपीकिसन बाजोरिया आधीपासूनच होते. मी पोहोचताच गवळी यांनी मला आवाज दिला आणि माझ्याशी भांडण सुरू केले. त्या ठिकाणी ५०-६० लोक उभे होते. माझ्याशी खेटे घेऊ नका, तुमच्या तक्रारी करीन. सीबीआयपर्यंत तक्रारी करीन असे म्हणून दमदाटी केली. तुम्हाला पाहून घेईन, संपवून टाकीन अशा धमक्या दिल्या. गवळी यांच्यासोबत ५०-६० लोक होते आणि त्यांच्यापैकी काही जणांनी माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्या अंगरक्षकाने त्यांना अडविले. त्यामुळे खासदार गवळी आणि त्यांचे समर्थक काय करतील याचा नेम नाही. अशा परिस्थितीमध्ये वाशिममधील शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत गवळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी पाटणी यांनी तक्रारीत केली आहे.

भावना गवळी यांनी पाटणी यांना अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ दोन दिवस वाशिम जिल्ह्याच्या विविध भागात बंद पाळण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

भावना गवळी आणि राजेंद्र पाटणी यांचे राजकीय वैर जुने आहे. पाटणी हे पूर्वी शिवसेनेतच होते. शिवसेनेचे ते विधान परिषद सदस्य राहिले तसेच शिवसेनेचे विधानसभा सदस्यही राहिले. मात्र, नंतर ते गवळी यांना कंटाळून भाजपमध्ये गेले आणि आमदार म्हणून निवडूनही आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER