जिल्हा परीषदेतही भाजप- सेनेत होणार युती

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून येण्यासाठी भाजपने माघार घेत मार्ग मोकळा करून दिल्याने शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान झालाय. त्यातच आता राज्यातील जिल्हा परिषदांमध्येही भाजपने शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू करण्याचा निर्णय भाजपच्या कोअर टीमच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार दोन्ही पक्षांमध्ये लवकरच चर्चा सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नुकतीच भाजपच्या कोअर टीमची बैठक पार पडली. या बैठकी मध्ये राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्थानिक पातळीवर चर्चा सुरू करण्यास सांगितले आहे. राज्यातील २५ जिल्हा परिषदांसाठी निवडणूक झाली आहे. त्यामध्ये भाजपला जळगाव, लातूर, वर्धा आणि चंद्रपूर येथे बहुमत मिळाले आहे. तर, शिवसेनेला रत्नागिरी जिल्हा परिषदेत बहुमत मिळाले आहे. मात्र, भाजपला औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली येथे शिवसेनेची मदत लागणार आहे. तर, शिवसेनेलाही नाशिक, हिंगोली आणि यवतमाळमध्ये भाजपचा पाठिंबा हवा आहे.

भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास राज्यातील १३ ते १४ जिल्हा परिषदेत युती होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षातून ज्यांची संख्या जास्त असणार त्या पक्षाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले जाणार आहे.