मुंख्यमंत्र्यांनी सीएएला काँग्रेसचा विरोध आहे हे आधी समजून घ्यावे – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

मुंबई : सीएएचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर जोपर्यंत निर्णय येत नाही, तोपर्यंत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएएबाबत कोणतीही ठोस भूमिका घेऊ नये. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची वाट बघावी, असा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

पवारांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांची सावरासावर; म्हणाले तो ‘निर्णय’ माझा नाहीच

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चव्हाण म्हणाले की, सीएएला काँग्रेसचा विरोध का आहे हे आधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी समजून घ्यायला हवे. त्याचा नीट अभ्यास केल्याशिवाय आणि त्यात कोणते बदल करणे आवश्यक आहे हे समजल्याशिवाय शिवसेनेने कोणतीही जाहीर भूमिका घेऊ नये. सीएएचा अभ्यास केला पाहिजे, काँग्रेसची भूमिका ऐकून घेतली पाहिजे, त्यानंतरच त्यांनी जी काही भूमिका घ्यायची ती घ्यावी, असे आपले म्हणणे आहे. हा कायदा कसा घटनाविरोधी आहे, त्यात ठरावीक लोकांना ‘नॉन सिटीझन’ कसे म्हटले गेले आहे आणि ठरावीक लोकांना कसे ‘बेकायदेशीर निर्वासित’ म्हटले गेले आहे हे दोन भाग मी त्यांना समजावून सांगेन. डिसेंबर २०१४ च्या आत जे भारतात आले, त्यांच्यासाठी सीएए आहे आणि २०१४ नंतर जे आले त्यांच्याविषयी हा कायदा काहीच सांगत नाही, असा दावाही त्यांनी केला.

शिवसेनेने सीएएला समर्थन देऊन हिंदू मतांची जपवणूक करायची आणि राष्ट्रवादीने विरोध करून मुस्लिम मतांना सांभाळायचे, अशी एक राजकीय खेळी या सगळ्यामागे असल्याची एक चर्चा आहे. हे खरे आहे काय? असा प्रश्न विचारला असता पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे म्हणत त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले.