शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा व्यर्थ – पंकजा मुंडे

Pankaja Munde

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा आता व्यर्थ आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केली. शिवसेना-भाजपची युती २०१४ सालातही तुटली होती. त्यानंतर आता पुन्हा युती तूटून राज्यात सरकार स्थापन होऊनही एक वर्ष उलटले आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर चर्चा करण्यात काही अर्थ उरलेला नाही, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

पंकजा मुंडे मंगळवारी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असल्यामुळेच मी त्यांना अभिवादन करण्यासाठी आल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे. स्मृतिस्थळ असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी मी आले. बाळासाहेब पक्ष म्हणून एका विचाराचे राहू शकत नाहीत, ते सर्वांचे आहेत. बाळासाहेब आम्हा मुंडे कुटुंबासाठी आदरणीय आहेत. मुंडेसाहेब आणि बाळासाहेब यांचे घरगुती संबंध होते. इतर अनेक पक्षातही असे संबंध असतात, असं पंकजा मुंडे बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिल्यानंतर म्हणाल्या.

दरम्यान, मराठवाड्यातील भाजपचे दिग्गज नेते जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाला रामराम ठोकला. गायकवाड यांची समजूत घालण्याचा पक्षाकडून प्रयत्न झाला, तरीही ते भाजप सोडून गेले. पक्ष आणखी ताकदीने निवडणूक लढेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER