मेट्रो भूमीपूजनाच्या कार्यक्रमावरून शिवसेना आणि भाजपमधे तणाव

metro bhoomipujan

ठाणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. परंतु मोदींच्या दौऱ्याआधी शिवसेना आणि भाजपमधला तणाव आणखीच वाढला आहे. दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. मेट्रो भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार घातला आहे. मुंबई मधे उद्धव ठाकरे यांच्या कोस्टल रोडच्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार घातला होता, त्याचा वचपा शिवसेनेने कल्याण च्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. कल्याण फडके मैदानात दुपारी दोनच्या सुमारास कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रो प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते भूमीपूजन होईल. परंतु या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना निमंत्रण नसल्याने शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि नगरसेवक उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून मेट्रोच्या श्रेयवादासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात येत आहे.

याआधी उद्धव ठाकरेंनी मुंबईतील कोस्टल रोडच्या भूमीपूजन केलं होतं. त्यावर भाजपने बहिष्कार घातला होता. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई रंगलेली दिसत आहे.