काश्मीरप्रमाणे दिल्लीतील दंगलीवरही नियंत्रण मिळवायला हवे; शिवसेनेचा अमित शहांना सल्ला

amitshahuddhavthackeray

मुंबई :- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. असे असतानाचं भारताची बदनामी व्हावी या उद्देशाने दोन महिन्यांपासून शांततेने सुरू असलेल्या सीएएविरोधातील आंदोलनाने हिंसक वळण घेतले. देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात एका पोलिसासह १३ जणांचा बळी घेतला आहे. शिवाय ६७ पोलिसांसह १५० हून अधिक दिल्लीकर जखमी झाले आहेत. आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेने आजच्या सामनातील अग्रलेखातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सल्ला दिला आहे.

ही बातमी पण वाचा : देवेंद्रजी विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा; ‘सामना’तून शिवसेनेचा सल्ला

सीएए समर्थक आणि विरोधक समोरासमोर आल्याने दिल्लीत हिंसाचार भडकला. दोन्ही बाजूने हल्ले झाले. पोलिसांवर हल्ले झाले हे चिंताजनक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दिल्लीतील स्वागत दंगलीच्या आगडोंबाने, रस्त्यावरील रक्ताच्या सडय़ाने, आक्रोश, किंकाळ्या, अश्रुधुरांच्या नळकाड्यांनी, दिल्लीतील या भयपटाने व्हावे हे बरे नाही. ट्रम्पसाहेब हे प्रेमाचा संदेश घेऊन दिल्लीत आले, पण त्यांच्या समोर हे काय घडले? अहमदाबादमध्ये ‘नमस्ते’ आणि दिल्लीत आगडोंब! दिल्लीची इतकी बदनामी याआधी कधीच झाली नव्हती. ज्या हिमतीने कश्मीरात 370, ‘35 ए’ सारखी कलमे हटवली, त्याच हिमतीने दिल्लीतील दंगलीवरही नियंत्रण मिळवायला हरकत नव्हती. असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

आजचा सामनातील अग्रलेख…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हिंदुस्थान दौरा सुरू असतानाच दिल्लीत दंगलीचा आगडोंब उसळला आहे. पंतप्रधान मोदी व ट्रम्पसाहेब यांच्यात चर्चा सुरू असताना शहर जळत होते. दंगलीमागची कारणे काहीही असोत, पण देशाच्या राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था राखायला केंद्र सरकार अपयशी ठरले आहे असा गदारोळ उठू शकतो. 1984 सालचा शीखविरोधी दंगलीचा ठपका आजही काँग्रेसवर ठेवला जातो. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शीख समुदायास लक्ष्य करण्यात आले व त्यात शेकडो शीख बांधवांचे बळी गेले. त्यास काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याची ओरड इतक्या वर्षांनंतरही भाजपचे लोक करीत आहेत. दिल्लीत सध्या हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे, लोक रस्त्यांवर काठय़ा, तलवारी, रिव्हॉल्व्हर घेऊन उतरले आहेत, रक्ताचे सडे पडत आहेत. एखाद्या भयपटाचे चित्र सध्या दिल्लीत दिसत आहे, ते 1984 च्या दंगलीचीच भयाण वास्तवता दाखवणारे आहे. दिल्लीतील सध्याच्या दंगलीस जबाबदार कोण? हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व आपले पंतप्रधान मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत असताना त्यांच्या डोळ्यांसमोर हा असा रक्तपात व्हावा हे दृष्य काही चांगले नाही. दिल्ली विधानसभा निवडणूक आटोपल्यावर हिंसाचार उसळला आहे हे रहस्यमय आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला व आता दिल्लीची ही अशी दशा झाली आहे.

ही बातमी पण वाचा : सत्तेसाठी महापुरुषांचा किती अपमान सहन करणार?, फडणवीसांचा शिवसेनेला प्रश्न

दिल्लीतील शाहीनबाग परिसरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे सीएएविरोधात लोक अनेक दिवसांपासून रस्ता अडवून बसले आहेत. हे आंदोलन संपावे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थ नेमले तरीही आंदोलन संपत नाही. भाजपच्या काही नेत्यांनी इशारे, धमक्यांची भाषा केली व तिथेच ठिणगी पडली असे सांगितले जाते. म्हणजे शांतपणे चाललेले हे आंदोलन भडकावे व त्याचे पर्यावसान आज भडकलेल्या दंगलीत व्हावे अशी कुणाची इच्छा होती काय? निदान ट्रम्प महाराज परत जाईपर्यंत तरी संयम राखायला हवा होता. ट्रम्पसाहेबांनी त्यांच्या भाषणात पाकला दहशतवाद संपविण्याचा इशारा दिला. पाकिस्तानशी लढण्यासाठी ट्रम्प हिंदुस्थानला संहारक क्षेपणास्त्रे देणार आहेत, पण हा शेवटी व्यापार आहे व त्याची अब्जावधी डॉलर्सची किंमत आपल्याला चुकवावी लागेल. ट्रम्प यांनी मोदी यांचे कौतुक केले, किमान पंचवीसवेळा मोदी आणि ट्रम्प यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या, दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जे विविध करार-मदार झाले त्यात तीन अब्ज डॉलर्स किमतीची संहारक क्षेपणास्त्रे आमच्या गळ्यात मारली. अर्थात ट्रम्प यांच्या पायगुणाने देशात, महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढणार असेल तर क्षेपणास्त्र व्यवहाराकडे एक व्यापारी करार म्हणून पाहायला हवे. प्रश्न पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी क्षेपणास्त्रे मिळाली हा नसून मोठा फौजफाटा हाती असूनही दिल्लीची दंगल आटोक्यात येत नाही हा आहे. सीएए समर्थक आणि विरोधक समोरासमोर आल्याने दिल्लीत हिंसाचार भडकला. दोन्ही बाजूने हल्ले झाले.

पोलिसांवर हल्ले झाले हे चिंताजनक आहे. या दंगलीचा फायदा समाजकंटक व देशविरोधी घटक घेत आहेत व ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान असा हिंसाचार घडावा आणि त्यातून देशाची प्रतिमा मलीन व्हावी यासाठी दंगलीचे कारस्थान रचले आहे असे गृहमंत्रालय म्हणत आहे, पण असे कारस्थान रचले व रटारटा शिजले हे गृहमंत्रालयास समजू नये हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. ज्या हिमतीने कश्मीरात 370, ‘35 ए’ सारखी कलमे हटवली, त्याच हिमतीने दिल्लीतील दंगलीवरही नियंत्रण मिळवायला हरकत नव्हती. पोलीस मारले गेले आहेत, त्याहीपेक्षा गंभीर बाब अशी की, दिल्लीत लष्कराला पाचारण केल्याचे वृत्त आले व लष्करी वेशातील लोक दंगलग्रस्त भागात तैनात असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. लष्करी पोशाखातील शेकडो जवानांचे संचलन जाफराबाद परिसरात झाले, पण “हे आमचे लष्कर नाही’’ असा खुलासा लष्कराच्या अधिकृत प्रवक्त्याने केला. मग दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण? याआधी ‘बुरखा’ वगैरे घालून भाजपची एक कार्यकर्ती शाहीनबाग आंदोलकांच्या गर्दीत घुसली होती. त्यामुळे नक्की कोण कोणाच्या पोशाखात व मुखवटय़ात फिरत आहेत ते समजायला मार्ग नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दिल्लीतील स्वागत दंगलीच्या आगडोंबाने, रस्त्यावरील रक्ताच्या सडय़ाने, आक्रोश, किंकाळ्या, अश्रुधुरांच्या नळकाडय़ांनी, दिल्लीतील या भयपटाने व्हावे हे बरे नाही. असेही शिवसेनेने म्हटले आहे.


Web Title : Shiv Sena advises Amit Shah – Saamana Editorial

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)