अर्णवच्या अटकेसाटी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मानले आभार

CM Uddhav Thackeray - Arnab Goswami

मुंबई : अन्वय नाईक (Anvay Naik) प्रकरणात पत्रकार अर्णव गोस्वामींना (Arnab Goswami) अटक झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसैनिकांनी मात्र, अर्णवच्या अटकेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (CM Uddhav Thackeray) आभार मानले आहे.

अर्णव गोस्वामींना सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात राज्य सरकारवर आरोप केल्यामुळे आणि विशेषतः मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले होते. मात्र, राज्याचा कारभार असताना विनाकारण कायदा-सुव्यवस्था हातात घेणे योग्य नाही. कायद्याने लढाई लढायला हवी अशी समजूत मुख्यमंत्री उद्धव टाकरेंनी शिवसैनिकांची काढली होती.

बुधवारी मात्र रिपब्लिक भारत टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अटक झाल्यानंतर शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात त्याने आत्महत्या केली नसून ती हत्या असल्याचा कांगावा समाज माध्यमातून सुरू झाला. विरोधी पक्षातील नेत्यांनी हवा दिल्यानंतर या प्रकरणातील गांभीर्य आणखी वाढले. मुंबई पोलिसांच्या तपासात आणि शवविच्छेदन अहवालात ही आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तरीही या प्रकरणात मुंबईत गुन्हा दाखल झाला नाही, मात्र बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तर मुंबई पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. त्यात रिपब्लिकन टीव्हीने रोजच्या रोज या प्रकरणात सनसनाटी आरोप करायला सुरूवात करत शिवसेनेला चांगलेच अडचणीत आणले. एका युवा मंत्र्याचा यात हात असल्याचा आरोप केल्यामुळे तर आणखीनच खळबळ निर्माण झाली. विशेष म्हणजे आरोप करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला होता. मात्र या प्रकरणात ‘मातोश्री’ला विचारल्याशिवाय कोणीही काहीच करायचे नाही, असा आदेशच शिवसेना नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे कळते.

सुशांतसिंह प्रकरणात गोस्वामी यांच्या बेलगाम आरोपांनंतर त्यांचा स्टुडिओ फोडण्यापासून ते त्यांच्या तोंडाला काळे पुसण्यापर्यंतची रणनीती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आखण्यात येत होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विशेषतः आदित्य ठाकरे यांचा त्याला ठाम विरोध होता. राज्यात सत्ता असतानाही आपण हातावर हात धरून का बसलो आहोत, अशी विचारणा शिवसैनिक आणि पदाधिकारी करत होते. मात्र बुधवारी गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे न थकता कौतुक करताना दिसत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER