पालकमंत्री शिंदेंच्या ‘क्लस्टर ड्रीमप्रोजेक्ट’ला शिवसैनिकांचाच विरोध

ठाणे: ठाण्यात मनसेने (MNS) नेहमीच पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध आवाज उठवला आहे. आता तर, शिवसैनिकांनीही पालकमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या विरोधात आवाज उठवला आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘क्लस्टर’ (ClusteR) हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र या योजनेला शिवसैनिकांनीच (Shivsena) विरोध दर्शवला आहे.

पालकमंत्री यांचे क्लस्टरच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मालकी हक्काचे अधिकृत घर देण्याचे स्वप्न आहे. पण, या स्वप्नाला खिळ घालण्याचे काम स्थानिक शिवसैनिकांकडून होत असल्याचा आरोप भाजपा नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला आहे.

कॅसरमील जवळील आझादनगर नं.१ (मसाणवाडा) येथे बायोमेट्रीक सर्व्हेक्षण सुरु असून या सर्व्हेला स्थानिक शिवसैनिक चंद्रकांत सुर्वे आणि अमित जैसवाल यांनी विरोध केला आहे.

कॅसरमील जवळ असलेला आणि आनंद पार्कची मागील बाजू असलेल्या आझादनगर नं.१ (मसाणपाडा) येथे समूह विकास योजनेअंतर्गत येथील झोपडपट्टीचा विकास करण्याचे नियोजित आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात या योजनेचे काम सुरु आहे. आझादनगर १ येथील विभागाचाही या योजनेत समावेश आहे. या संदर्भात या विभागात मागील काही महिन्यांपासून बैठका सुरु आहेत.

तसेच महापालिकेने येथिल नागरिकांना सांगून बायोमेट्रीक सर्व्हेक्षणाचे कामही सुरु केले आहे. मात्र, अचानक येथील शिवसैनिक चंद्रकांत सुर्वे आणि अमित जैसवाल यांनी सर्व्हेक्षणाला विरोध केल्याची माहिती नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली.

दरम्यान, आमच्या शंकांचे प्रथम निरसन करा नंतर सर्व्हेक्षण करा अशी या शिवसैनिकांची मागणी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER