राऊतांना धमकी दिल्यानंतर शिवसैनिक रस्त्यावर; निलेश राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध

Nilesh Rane - Shiv Sena - Vinayak Raut

सिंधुदुर्ग : भाजप (BJP) नेते निलेश राणेंनी (Nilesh Rane) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांना धमकी दिल्यापासून सिंधुदुर्गातील (Sindhudurg) राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. राणेंच्या धमकीनंतर शिवसैनिक थेट रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना (Shiv Sena) जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत, संदेश पारकर आणि जिल्हाभरातील कार्यकर्ते एकवटले असून, निलेश राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. निलेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे  निवेदनाद्वारे   केली.

विनायक राऊत ही खासदार पदाच्या लायकीची व्यक्ती नाही. संसदेत काय बोलायचे हेदेखील त्यांना कळत नाही. केवळ लाट होती म्हणून ते कोकणातून निवडून आले. त्यांच्यात हिंमत असेल तर या क्षणाला खासदाराकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी. मग त्यांना किती मतं पडतात, हे पाहूच. विनायक राऊत यांच्यात तेवढी हिंमतही नाही. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा बंदोबस्त करून राऊतांना कोकणातून हद्दपार करू, अशी गर्जना निलेश राणे यांनी केली.

काही दिवसांपूर्वीच जिल्हा नियोजन बैठकीत विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतरही विनायक राऊत सातत्याने राणे यांच्या टीकेला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत आहेत. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी विनायक राऊत यांना इशारा दिला. तुम्ही भाषा बदलली नाहीत तर जिथे दिसाल तिथे फटकावीन, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला. दरम्यान निलेश राणेंच्या अशा सततच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली तर निलेश राणे जबाबदार राहणार असल्याचेही या नेत्यांनी म्हटले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER