शिवने ठेवले वर्मावर बोट

Shiv Thakare

वर्षभरापूर्वी आलेल्या कोरोना (Corona) नावाच्या संकटाने प्रत्येकाच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी दिली आहे. अगदी सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रिटी कलाकारांचे आयुष्य, त्यांची विचार करण्याची पद्धत, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये माणुसकीची किंमत ही प्रत्येकालाच कळून चुकली आहे. हाताशी प्रचंड पैसा असलेल्या माणसांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळू शकला नाही म्हणून आयुष्य गमवावं लागलं अशा घटना देखील घडल्या. अभिनेता आणि कोरिओग्राफर शिव ठाकरे याने नेमके याच गोष्टीकडे लक्ष वेधत त्याच्या सोशल मीडिया पेजवर एक असे विधान केले आहे की या विधानामुळे शिव ठाकरे नव्याने चर्चेत आला आहे. शिवने त्याच्या सोशल मीडिया पेजवर असं म्हटलं आहे की तुमच्याकडे पैसा आहे पण जर वेळ नसेल, कोणाला मदत करण्याची वृत्ती नसेल तर तुमच्या पैशाला, श्रीमंतीला कवडीमोलाचीही किंमत नाही. त्यामुळे माणसे जपा, नाती जपा. ही माणसंआणि नाती हीच तुमची खरी श्रीमंती आहे. शिवच्या चाहत्यांनी तर त्याला या पोस्टसाठी करोडो धन्यवाद दिले आहेतच पण सेलिब्रिटीच्या पलीकडे जाऊन शिव ठाकरेने मांडलेला हा विचार खरोखरच विचार करायला लावणारा आहे.

बिग बॉसच्या (Big Boss) दुसऱ्या सीझनमधला विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) हा फक्त अभिनेत्री वीणा जगतापचा बॉयफ्रेंड म्हणूनच चर्चेत असतो असं नाही तर सध्या तो एका वेगळ्या कारणाने सोशल मीडिया जगतात फेमस झाला आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून करोनामुळे जनजीवन ठप्प झालं होतं. याचा सर्वाधिक फटका हा मनोरंजन क्षेत्रात काम करत असलेल्या कलाकारांना बसला होता. सिनेमा, मालिका,नाटक याला खूप मोठा ब्रेक लागल्यामुळे सगळेच कलाकार घरात होते. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे बँक बॅलन्स चांगला होता. त्यांच्या दारात गाड्यांचा ताफा होता. आलिशान बंगले होते पण तरी देखील आलेलं मानसिक नैराश्य ते पचवू शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे त्यांची हक्काची म्हणावी अशी माणसे नव्हती. याच मुद्द्याकडे शिव ठाकरेने त्याच्या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

शिव ठाकरे सांगतो की, जर माझ्याकडे पाच सहा आधुनिक आलिशान गाड्या आहेत. प्रचंड मोठा बंगला आहे आणि घरात जी काही माणसं आहेत त्यांना एकमेकांशी बोलायला वेळ नाही, त्या गाडीतून एकत्र फिरायला जायला वेळ नाही. एक घरात येतो तेव्हा दुसरा बाहेर गेलेला असतो, एक दिवसभर घरात असतं तर दुसरा रात्रभर बाहेर असतो. अशा घरातील माणसांना जर एकमेकांसाठी वेळ नसेल तर गाड्यांचा आणि बंगल्यांचा काहीच उपयोग नाही. त्याउलट जर माझ्याकडे एक साधी चार चाकी गाडी आहे. जी फार स्पेसियस नाही. पण घरातील माणसांना एकत्र फिरायला जाता येईल, ऍडजेस्ट करून गाडीत बसताना त्यांना आनंद होईल ते खरं समाधानाचे जग आहे. अशी जीवनशैली गेल्या काही दिवसांपासून हरवली होती. करोना काळात जेव्हा सगळे कुटुंब घरात होतं तेव्हा अनेकांना कुटुंबाचे महत्त्व जाणवलं. पण त्यातूनही काहींनी बोध न घेता माणसांची किंमत केली नाही, त्यांना खरंच आयुष्याचे महत्त्व कळले नाही. त्यामुळे पैसा आहे पण वेळ नाही असं म्हणत राहणाऱ्यांनी पुन्हा एकदा माणसं कमावण्यासाठी कसं जगायचं असतं हे शिकले पाहिजे.

शिव ठाकरे याने बिग बॉसमधले विजेतेपद पटकावलं. अतिशय संघर्ष करून शिव ठाकरे त्याच्या आत्तापर्यंतच्या यशापर्यंत पोहोचलेला आहे. इंजिनिअरिंग शिकत असताना त्याला नृत्याची आवड होती, परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्याला नोकरी करणेदेखील भाग होतं. जेव्हा त्याला नोकरी मिळाली तेव्हा त्या ऑफिस मधील बॉसने असं सांगितलं होतं की तुला बारा ते पंधरा तास काम करावे लागेल आणि सुट्टी मिळेलच याची खात्री नाही त्या वेळेला फक्त एका कारणासाठी शिवने ती नोकरी स्वीकारली नाही आणि ते कारण होतं की जर मी इतकं काम करून माझ्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी एक सुट्टी सुद्धा घेऊ शकत नसेन तर त्या नोकरीमध्ये मला काहीही समाधान मिळणार नाही. आयुष्यात माणूस त्याच्या कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी काम करत असतो आणि मी नेहमीच नोकरी आणि पैशाच्या मागे धावत राहिलो तर त्यामध्ये मी माझ्या कुटुंबाच्या सहवासात मिळणारे क्षण हरवून बसेन असा विचार शिवने त्या नोकरीला नकार दिला होता. करोना काळात त्याला त्याच्या या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली. त्याच्या आजवरच्या प्रत्येक संघर्षामध्ये पैशापेक्षा त्याने कमावलेल्या माणसांनी व नात्यांनी केलेली मदत ही तो कधीही विसरू शकलेला नाही आणि म्हणूनच अनलॉकनंतर पुन्हा सगळं रुळावर येत असताना त्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने शिव कौतुकाचा धनी झाला आहे.

शिव ठाकरे हा मूळचा अमरावतीचा असून अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच नृत्याची आवड असल्याने त्याने स्वत: व्हिडिओ बघून नृत्य शिकला. त्यानंतर त्याने नृत्याचे क्लास घेत शिक्षण पूर्ण केले. सुरूवातीच्या काळात तो वृत्तपत्र विक्रीचे काम करायचा. त्याने शेतीमध्ये राबून पैसे कमावले आहेत. एमटीव्ही च्या रोडीज या रिअॅलिटी शोमध्ये त्याची निवड झाली आणि या स्पर्धेत तो अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यानंतर बिग बॉस मराठी या शोच्या दुसऱ्या सीझनचाही तो विजेता आहे. याच शोमध्ये त्याचे आणि अभिनेत्री वीणा जगतापचे प्रेम जुळले असून लवकरच ही जोडी लग्न करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER