बेघर, निराश्रितांसाठी ‘शिवभोजन’ ठरतेय वरदान !

Shiv Bhoja Thali Scheme of during the commencement of Corona

चंद्रपूर: महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात चंद्रपूर शहर, राजुरा, वरोरा व बल्लारपूर या 3 मोठ्या तहसीलच्या ठिकाणी जवळपास 1300 थाळी रोज नागरिकांना वाटप केल्या जात आहे. लवकरच अन्य तालुक्यांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

राज्यात नवे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात आवडती योजना म्हणजे शिवभोजन थाळी. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन योजनेने संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध केली.

कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये ही योजना चंद्रपूर जिल्ह्यासाठी संजीवनी योजना म्हणून सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या काळात शिवभोजन थाळीची किंमत 10 रुपयांवरून आता केवळ 5 रुपये केली आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी योजना उपयोगी ठरत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी या काळात ही योजना अत्यंत प्रभावीपणे जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासन राबवित आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यांमध्ये आगामी काळात शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत कोरोना प्रादुर्भाव झाल्यामुळे संचारबंदीच्या काळात ही उपाययोजना चंद्रपूर शहरासह वरोरा, राजुरा,बल्लारपूर, या 3 महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये देखील सुरू झाली आहे. सध्या दीड हजारावर थाळी वाटप केल्या जात आहे. शिव भोजन थाळीचे स्वरूप संचार बंदीच्या काळात बदलले असून आता पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये तयार जेवण दिले जात आहे.

बंद डब्यामध्ये वाटप करण्यात येणाऱ्या या शिवभोजन थाळीचा वितरण करताना फोटो काढण्यात येतो. प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. यामुळे गरजू ,गरजवंत व निराश्रित लोकांनाच याचा लाभ मिळत आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र ॲपवर देखील दिले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय गरीब लोकांसाठी सुरू केलेल्या या योजनेची उपयुक्तता लॉकडाऊनच्या काळात आणखी प्रखरतेने पुढे आली आहे.