शिर्डी संस्थान कर्मचारी कपात : विखे पाटलांचा न्यायालयाच्या आवारात आंदोलनाचा इशारा

Shirdi Sai Mandir - Radhakrishna Vikhe Patil

अहमदनगर : शिर्डी साई संस्थानच्या (Shirdi Sai Sansthan) कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत अनेकदा पत्र पाठवूनही साई संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष वेळ देत नाहीत. त्यांची भेट मिळविण्यासाठी हजारो कामगार व ग्रामस्थांना घेऊन नगरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात धरणे देण्याचा इशारा माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) आज कामगारांच्या बैठकीत यांनी दिला. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करू, असेही ते म्हणालेत.

कोरोनामुळे (Corona) १७ मार्च पासून साई मंदिर बंद आहे. याचा मंदिराला मिळणाऱ्या दानाला मोठा फटका बसल्याने अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली. यातील अनेक कर्मचारी कोरोनाच्या संकटात नर्सिंग स्टाफमध्ये काम करत आहेत. त्यांच्याही पगारात कपात करण्यात आली आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत दखल घेतली जात नसल्याने आज भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामगारांची बैठक घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला.

उच्च न्यायालयाने (High Court) संस्थानचा अंतरिम कारभार पाहण्यासाठी तदर्थ समितीची नियुक्ती केली आहे. इथे समितीचे अध्यक्ष न्यायाधीश नाहीत तर संस्थानचे अध्यक्ष आहेत. त्यांना कामगार व लोकप्रतिनिधींनाही भेटण्यास वेळ नसेल तर त्यांनी पदावरून दूर व्हावे, अशी मागणी विखे यांनी केली. समितीच्या मनमानी काराभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी संस्थानचे कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील. गुरूवारी ग्रामस्थ ‘घंटानाद’ व ‘महाआरती’ करतील. यानंतरही समितीच्या धोरणात फरक पडला नाही तर मी कामगारांच्यासोबत लाक्षणिक उपोषणाला बसेन, असे विखे यांनी सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवरही बोचरी टीका करताना राज्यात ‘सरकार’ नावाची व्यवस्था कुठे आहे? असा प्रश्न करून केवळ इव्हेंट मॅनेजमेंट सुरू आहे, असा आरोप केला. सरकार काय करत आहे, हे त्यांनी माहीत नाही आहे. केवळ मोठमोठे दावे केले जात आहेत. कोरोनासाठी मोठे हॉस्पिटल उभारल्याचे केवळ दावे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारनं केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. प्रत्येक मंत्री संस्थानिक आहे मात्र, जनतेसाठी काहीही करण्याची त्यांची वृत्ती नाही, या शब्दात विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि उच्च व तंत्रशिक्षण राज्य मंत्री प्राजक्त तनपुरेंसह राज्य सरकारला टोमणा मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER