शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी बेमुदत बंद, तोडगा निघेपर्यंत माघार नाही

शिर्डी : साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्यातील पाथरी असल्याने त्याच्या विकासाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर जन्मस्थळावरून वाद चिघळला असून त्या विरोधात शिर्डीकर एकवटले आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही घोषणा मागे घेत नाही तोपर्यंत शिर्डी बंद मागे घेणार नसल्याची घोषणा शिर्डीच्या ग्रामसभेत करण्यात आली आहे. पाथरी हे जन्मस्थळ असल्याचा कुठेही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे या विरोधात शनिवारी मध्यरात्री 12 पासून हा बंद सुरु होत आहे. साईमंदिर आणि साईबाबांचे भक्तनिवास आणी प्रसादालय राहणार सुरू राहणार आहे. पाथरीचा विकास जन्मभुमी म्हणून करू नये तसेच सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे व्यापारी वर्गाला आवाहन करण्यात आले आहे.

साईबाबाचे जन्मस्थळ म्हणून पाथरीच्या विकास आराखड्याचे लवकरच भूमिपूजन केले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा दौऱ्याच्या दरम्यान केली होती. या घोषणेनंतर शिर्डीत नाराजी पसरली. साईबाबांचा जन्म, धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहलेले असतानाही जन्मस्थानाविषयी दावे केले जातात. हे सर्व प्रकार निंदनीय असल्याचे शिर्डीतल्या नागरिकांनी सांगितले. साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचे जन्मस्थळ म्हणुन पाथरीचा विकास करण्यावर शिर्डीकरांनी आक्षेप घेतला आहे. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी शिर्डीकरांनी बंदचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला.