शिखर बँक घोटाळा : पोलिसांचा चौकशी अहवाल फेटाळा; अण्णा हजारेंची याचिका

Anna Hazare

अहमदनगर : शिखर बँक घोटाळा ( Shikhar Bank scam)झाल्याचा पुरावा सापडला नाही त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यासह अन्य ६९ जणांविरोधातील प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा मुंबई पोलिसांचा अहवाल म्हणजे धूळफेक आहे, तो फेटाळा, अशी मागणी करणारी याचिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी निषेध सत्र न्यायालयाकडे केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह घोटाळ्याशी संबंधित इतर राजकीय नेत्यांची पोलिसांनी चौकशी केली नाही. राजकीय दबावाखाली, आरोपींना पाठीशी घालण्याच्या हेतूने पोलिसांनी या प्रकरणी घोटाळा झाला नसल्याचा दावा केला आहे, असा आरोप हजारे यांनी केला.

पोलिसांच्या अहवालाला विरोध करणारी ही निषेध याचिका हजारे यांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत सत्र न्यायालयात दाखल केली आहे. हजारे यांनी सुरुवातीला उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करून या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबवण्याची सूचना न्यायालयाने केल्यानंतर हजारे यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती पण, चार वर्षे उलटली तरी पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली नाही व गुन्हाही दाखल केला नाही, असे हजारे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER