शेवंता पडली कोकणच्या प्रेमात

Shevanta

एखादी मालिका किंवा व्यक्तिरेखा कलाकाराचे आयुष्य बदलून टाकत असते. प्रत्येक कलाकार त्याच्या अभिनय प्रवासात अशा एका टर्निंग पॉइंट देणाऱ्या भूमिकेची वाटच बघत असतो. अपूर्वा नेमळेकर हिलाही ब्रेक मिळाला तो ‘शेवंता पाटणकर’ (Shevanta Patankar) या भूमिकेने. म्हटलं तर किती साधं सरळ नाव आहे हे पडद्यावरचं; पण शेवंता यापेक्षा अण्णांची शेवंता फारच हिट झाली बुवा. खरं तर मालिका संपण्याच्या वळणावर आहे. त्यात शेवंताच्या आत्महत्येने तिचा रोलही ऑफएअर गेला आहे; पण ‘रात्रीस खेळ चाले’ म्हटलं की शेवंता आठवतेच. जसं प्रेक्षक ही मालिका विसरणार नाहीत तसंच शेवंता म्हणजे अपूर्वालाही कोकणला विसरता येणार नाही. हे तिच्या सोशल मीडिया पेजवरून (Social Media) दिसतंय.

मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने कोकणातील आकेरीत तळ ठोकून असलेल्या अपूर्वाचा पाय कोकणातून निघता निघेना. म्हणूनच की काय तिने येवा…कोकण आपलंच आसा असे कॅप्शन देत कोकणातील पावसाळी वातावरणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. एखाद्या शहराच्या पर्यटन ब्रॅंडिंगसाठी सेलिब्रिटींना ऑफर्स देणे आणि कलाकारांनी अशा पर्यटनासाठी शहराचे ब्रँड अँबेसेडर होणं काही नवीन नाही. अगदी महानायक अमिताभ बच्चन यांनी राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशमधील पर्यटनासाठी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या जाहिराती केल्या आहेत.

शाहरूख खान, अक्षयकुमार यांच्यासह अनेक कलाकार अशा ऑफर्स आनंदाने स्वीकारतात. मराठीतही गायक अवधूत गुप्तेने कोल्हापूरचे ब्रँडिंग केलेय. तर सांगायची गोष्ट काय, पर्यटनवाढीसाठी ब्रँड बनत पैसे कमावणे हे कलाकारांसाठी एक कामच झालंय. पण सध्या कोकणच्या प्रेमात आकंठ बुडालेली आणि कोकणची सफर करत असताना कधी पावसाचे, कधी डोंगरदऱ्यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करणारी अपूर्वा काही शेवंतामधून बाहेर यायचं नाव काढेना. तिला कुणी कोकण पर्यटनाचे प्रमोशन करण्याची ऑफर्स दिलेली नाही. पण ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या सिक्वेलमध्ये जेव्हा अपूर्वाची शेवंता म्हणून वर्णी लागली तेव्हापासून ती कोकणमध्ये आहे.

लॉकडाऊन काळात शूटिंग बंद होतं तेव्हाही तिला आकेरी गावाची खूप आठवण यायची. अशा अनेक पोस्ट तिने तिच्या फेसबुकवर लिहिल्या होत्या. गावातील बडं प्रस्थ असलेल्या आणि बाईलवेड्या अण्णा नाईक यांच्या प्रेयसीच्या शेवंताच्या भूमिकेला अपूर्वाने इतके लोकप्रिय केले की अण्णा आणि शेवंता यांच्यावर सोशल मीडियामध्ये असंख्य मीम्स तयार झाले. खरं तर शेवंताची भूमिका ही नाईकांचे घर उद्ध्वस्त करणारी. त्यामुळे माई नाईक या अण्णांच्या बायकोवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी शेवंता म्हणजे पक्की खलनायिका. तरीही शेवंताचा फॅनक्लब वाढवण्यासाठी अपूर्वाच्या अदाकारी अभिनयाने कमाल केली. आता शेवंताचा रोल संपला, मालिकाही येत्या आठवड्यात संपेल; पण कोकणसोबत जोडलेलं नातं काही संपायचं नाही, असं म्हणत अपूर्वा कोकणप्रेमी झाली आहे.

कोकणातील लोकांचा आपलेपणा, मदतीची भावना, खायला घालण्याचा आग्रह अपूर्वाला खूपच आवडल्याचं ती सांगते. आता जाता जाता किमान कोकणचे निसर्गसौंदर्य, पावसाळा कॅमेऱ्यात टिपण्यात अपूर्वा दंग झाली आहे. कलाक्षेत्रात येण्यापूर्वी अपूर्वा बँकेत नोकरी करायची. अभिनयाच्या आवडीतून तिने काही मालिका, जाहिराती केल्या. ‘आभास’ या मालिकेत नायिका साकारण्याची तिला संधी मिळाली. त्यानंतर ‘आराधना’ ही मालिका, ‘एकापेक्षा एक डान्स शो’, ‘भाकरवडी’, ‘इश्कवाला लव्ह’ हे सिनेमेही केले. पण ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील वयापेक्षा मोठ्या असलेल्या अण्णांवर फिदा झालेल्या शेवंता या भूमिकेने अपूर्वाला कायमची ओळख दिली.

ही भूमिका स्वीकारणं हे तिच्यासाठी आव्हानच होतं. नायिका म्हणून मालिकेत मिळालेल्या ब्रेकनंतर थेट चार मुलांच्या वयस्कर अण्णा नाईकांच्या प्रेमात वेडी झालेली बाई ही ऑफर स्वीकारणं आणि लोकप्रिय करणं हा अपूर्वासाठी टास्कच होता आणि आता मालिका पडद्याआड जाताना शेवंताला मिस करणार ही प्रेक्षकांची प्रतिक्रियाच खूप मोठी आहे असं तिला वाटतंय. मालिकेत अण्णांवर फिदा झालेली शेवंताच्या रूपातील अपूर्वा आता कोकणवर खूप फिदा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER