शेवगा – नक्कीच आहारात घ्या !

Sevga

शेवग्याच्या शेंगा आमटी, सांबार भाजी स्वरूपात केली जाते. शेवग्याचे झाड बऱ्याच ठिकाणी आढळते. अंगणातही हे झाड लागलेले दिसते. या वृक्षांच्या फक्त शेंगाच उपयोगी नसून बीज पत्र मूळ औषधी गुणाचे आहेत. आयुर्वेदात याला शोभाञ्जन ( शोभायुक्त वृक्ष), शिग्रु ( तीक्ष्ण गुणयुक्त) तीक्ष्णगंधा ( तीक्ष्ण वास असलेला) अक्षीव, मोचक अशी पर्यायी नावे आली आहेत.

शेवगा उत्तम कफ,वात विकार कमी करणारा आहे. शेवगाच्या बियांचे चूर्ण नस्य चिकित्सेकरीता वापरतात. तीक्ष्ण असल्याने साठलेला कफ कमी होऊन शिरःशूल डोके जड पडणे ही लक्षणे दूर होतात. शेवग्याच्या बियांचे तेल संधिवात आमवातावर उपयोगी आहे. सूज वेदना कमी करण्याकरीता या तेलाचा वापर करतात.

शेवग्याची पाने कडू तिखट अशी असतात. याची भाजी करतात. जठराग्नि चांगली होणे, चव येणे हे फायदे होतात. अरुचि दूर होते. शेवग्याची पाने अथवा शेंगाची भाजी स्थौल्य लठ्ठपणा कमी करणारी आहे. त्यामुळे स्थूल व्यक्तींनी आहारात ही भाजी नेहमी घ्यावी.

नारूवर शेवग्याची पाने किंवा साल व सैंधव याचा लेप केला असता नारू बाहेर पडतो. शेवगा उष्णवीर्याचा प्रकृतीचा आहे. त्यामुळे मासिक स्त्राव व्यवस्थित येण्याकरीता फायदेशीर आहे. पाळी दर महिन्याला येत नसेल किंवा खूप त्रास होत असेल अशावेळी शेवगा सालीचा काढा उपयोगी ठरतो.

शेवग्याचा पानं वाटून लेप शिरःशूल दूर करणारा आहे. आमवात सांधेदुखीवर पाने वाटून त्याचा गरम गरम लेप लावल्यास सूज व वेदना कमी होतात. शेवगाच्या शेंगाची भाजी कृमिनाशक म्हणून काम करते. शेवगा पाला वाटून त्याचा लेप पोटावर बांधल्यास उदरशूल कमी होतो. कुठे खाज सुटत असेल चर्मरोग असेल तर पाने वाटून त्याचा लेप करावा. ज्वर व्याधी मुक्त झाल्यावर शेवग्याची शेंग भाजी रुपात आहारात घ्यावी. तापेमुळे जिभेला चव गेलेली असते. या अवस्थेत अरुचिनाशक शेवगा फायदेशीर ठरतो.

शेवगा उष्ण प्रकृतीचा असतो त्यामुळे हृदयाला उत्तेजना देतो. यामुळे रक्तदाब वाढतो. उष्ण असल्याने पित्तप्रकृतिच्या व्यक्तींनी जाणीवपूर्वक उपयोग करावा. रक्तविकार, घोळणा फुटणे रक्तस्राव विकार असतील तर त्रास वाढतो. आयुर्वेदात लेपांमधे शेवग्याच्या सालीचा वापर केलेला आहे. सूज व्रण ग्रंथि कमी करण्याकरीता या लेपांचा उपयोग केला जातो. सांधेदुखीवर स्वेदन / वाफ देण्याकरीता याच्या पानांचा सालीचा उपयोग करतात. पाण्यात उकळवून या पानांची वाफ दिली जाते. जकडलेले सांधे मोकळे होण्यास मदत होते. असा हा शेवगा वात कमी करणारा कफ निस्सारण करणारा आहे.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER