शेखर कपूर सुरु करणार ‘पाणी’चे काम

Shekhar Kapur - Paani

जगात 70 टक्के पाणी असले तरी त्यापैकी पिण्याच्या पाण्याचे प्रमाण हे अवघे तीन टक्के आहे. हे तीन टक्के पाणीच जगभरातील नागरिकांची तहान भागवत असते. परंतु या पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने पाण्याची चणचण निर्माण होऊन अनेक वर्षे उलटली आहेत. अनेक असे भाग आहेत जेथे पिण्याच्या पाण्याचे रेशनिंग करावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यावरून भविष्यात युद्ध होऊ शकेल असे भाकितही वर्तवण्यात आले आहे. पाण्याच्या या भीषण समस्येला वाचा फोडण्यासाठी प्रख्यात निर्माता दिग्दर्शक शेखर कपूरने (Shekhar Kapur) काही वर्षांपूर्वी पाणी सिनेमाला सुरुवात करण्याची घोषणा केली होती. मात्र काही कारणांनी हा चित्रपट सुरु होऊ शकला नव्हता. गेल्या वर्षी शेखर कपूरने स्वर्गीय अभिनेता सुशांत सिंहला घेऊन पाणीची योजना आखली होती. यशराजबरोबर बोलणीही झाली होती परंतु या सिनेमाचे बजेट मोठे असल्याने यशराजने नंतर याला नकार दिला होता. मात्र आता शेखर कपूर त्याच्या या महत्वाकांक्षी सिनेमाला सुरुवात करणार असल्याचे समजते.

शेखर कपूर सध्या लंडनमध्ये त्याच्या एका इंग्रजी सिनेमाच्या दिग्दर्शनात व्यस्त आहे. या सिनेमात हॉलिवुडची प्रख्यात अभिनेत्री एमा थॉम्पसनसह लिली जेम्स आणि शाजाद लतीफ हे कलाकार काम करीत आहेत. तीन दिवसांपूर्वी म्हणजे 6 डिसेंबरला शेखर कपूरचा वाढदिवस होता. त्याने त्याचा वाढदिवस सिनेमाच्या सेटवरच साजरा केला होता. शेखर कपूर लंडनमध्ये इंग्रजी चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असला तरी त्याच्या मनात अजूनही पाणी चित्रपट घोळत आहे. शेखर कपूरने वाढदिवसाच्या दिवशी म्हटले की, इंग्रजी सिनेमाचे शूटिंग पूर्ण करून मी लवकरात लवकर भारतात परतण्याचा विचार करीत आहे. भारतात परतल्यानंतर पाणी (Paani) चित्रपटाला सुरुवात करण्याची माझी योजना आहे.

शेखर कपूरने म्हटले, या सिनेमाचा गेल्या अनेक वर्षांपासून मी विचार करीत आहे. हा एक असा सिनेमा आहे जो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. प्रेक्षकांनाही शेखर कपूरच्या पाणीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. शेखर कपूर आता मुख्य भूमिकेसाठी कोणत्या कलाकाराला घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER