शेफालीस बिनधास्त क्रिकेट खेळायची मूभा आहे- शिखा पांडे

Shefali has license to play fearless-Shikha Pandey

महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामन्यात प्लेयर ऑफ दी मॅच ठरलेली अवघ्या 16 वर्षांची शेफाली वर्मा ही कौतुकाचा विषय ठरली आहे. न्यूझीलंडविरुध्दच्या विजयात तिच्यासह महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्याच शिखा पांडेने तिचे भरभरून कौतुक केले आहे. शिखा म्हणते की, शेफालीकडे बिनधास्त क्रिकेट खेळायचा परवाना आहे.

विश्वचषक स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करताना तिने खेळात वय नाही तर तुमचे तंत्र आणि तुमचे कौशल्य महत्त्वाचे असते हे दाखवून दिले आहे. स्पर्धेच्या प्रत्येक सामन्याठिकाणि ती चेंडू फटकावून काढतेय म्हणून तिने विक्रमी स्ट्राईक रेट गाठलाय. पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा ती भारतीय संघाला मिळवून देतेय.

बांगलादेशविरुध्द तिने 17 चेंडूतच 39 धावा केल्या आणि न्यूझीलंडविरुध्द 34 चेंडूत 46 धावा केल्या.

तिच्या या डावांबद्दल शिखा पांडे म्हणते की, ती भारीच खेळतेय. आम्ही तिला तिच्या खेळात कोणताही बदल सूचवलेला नाही. तिला तिचा धडाकेबाज खेळ बिनधास्त खेळायची आम्ही पूर्ण मूभा दिली आहे. ती विशेष आहे कारण 16 वर्षाच्या वयात मी तर क्रिकेट प्रशिक्षणसुध्दा सुरु केले नव्हते. एवढ्या कमी वयाची बिनधास्त खेळाडू संघात आहे ही फार मोठी बाब आहे.