ती बनली असती राजकीय विश्लेषक

Saily Sanjeev

मी अभिनयक्षेत्रात करिअर केलं नसतं तर कदाचित मी शेफ असतो किंवा मी एअर होस्टेस असते. इतकेच नव्हे तर कुणी इंजिनिअरिंगची पदवी घेऊन या क्षेत्रात आला आहे तर कुणी नावामागे डॉक्टर ही पदवी असतानाही कॅमेरासमोर अभिनय करत वेगळी वाट चोखाळत काम करत आहे. थोडक्यात काय तर शिक्षण एका वेगळ्या क्षेत्रात आणि सध्या मात्र ऑन कॅमेरा अभिनय करत असलेले अनेक कलाकार इंडस्ट्रीमध्ये आहेत.

अभिनेत्री सायली संजीव म्हणजे शुभमंगल ऑनलाइन या मालिकेतील शर्वरी हिला देखील राजकीय विश्लेषक म्हणून करिअर करायचं होतं. तिने फक्त हे स्वप्न बघितलच नाहीतर राज्यशास्त्र विषयामध्ये तिने पदवीही संपादन केली. पण अभिनय करण्याची एक संधी मिळाली आणि तिच्यासाठी या क्षेत्रात येण्याचं दार खुलं झालं. अजूनही तिला राजकारणाकडे पाहत असताना राजकारणाविषयी केवळ पोकळ बोलण्यापेक्षा त्यावर काहीतरी खरमरीत लिहावं असं नेहमी वाटत असतं हीच तिच्यामध्ये कुठेतरी जिवंत असलेल्या राजकीय विश्लेषकाचे लक्षण आहे .

काहे दिया परदेस या मालिकेतून गौरीची भूमिका करत घराघरात पोहोचलेली सायली संजीव अभिनय क्षेत्रात आली नसती तर नक्कीच आज एखाद्या वृत्तपत्र किंवा न्यूज चॅनेल मध्ये राजकारणातील घडामोडींचा खरपूस समाचार घेत असताना दिसली असती. तिला कॉलेजमध्ये असतानाच राजकारणाच्या अभ्यासाची गोडी लागली आणि राज्यशास्त्र विषयात तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं.

पदवीसाठी तिने निवडलेला प्रोजेक्ट राजकारणातील विश्लेषणावर आधारित होता. सायली एका मुलाखतीत बोलताना म्हणाली होती की राजकारणावर सामान्य नागरिक त्याची त्याची मत व्यक्त करत असतात. राजकारण हा प्रांतच नेहमी काही ना काही तरी घडामोडी, वेगवेगळे विधान डावपेच असा आहे. राज्यशास्त्र सर्व पैलूंनी समजून घेण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. खरेतर राजकारण हे सर्वसामान्य लोकांना आवडत नाही हे पण खरंच आहे पण एक राजकीय विश्लेषक म्हणून करिअर करणं ही सोपी गोष्ट नाही. आज आपण जे राजकीय विश्लेषक पाहतो त्यांना या राजकारण बद्दलचा खूप अभ्यास करावा लागतो. राजकारणात घडणारी एखादी गोष्ट किंवा एखादी घडामोडही सगळ्याबाजूने तपासून बघत मग त्यावर विश्लेषण करावे लागत असते. त्यामुळे राजकीय विश्लेषक हे क्षेत्र मला खूप आव्हानात्मक वाटतं.

राजकारणाविषयी असलेला हाच दृष्टिकोन मला कॉलेज जीवनामध्ये राजकीय विश्लेषक होण्याचं स्वप्न दाखवून गेला. पण दरम्यानच्या काळात माझ्या आयुष्यात अभिनय करण्याच्या अशा काही संधी उपलब्ध झाल्या की त्यामुळे माझ्या मनातले हे स्वप्न थोडंसं मागे पडलं. भविष्यात मला कधी राजकारणावर लिहायची वेळ आली तर मी नक्कीच त्यासाठी स्वतःला सज्ज ठेवेन. यासाठी आता मी माझ्या अभिनयाच्या कामातून नेहमी राजकारणाकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहत असते. माझ्या दृष्टीकोनातून राजकारणाचे मी स्वतः चे मत मांडत असते. सध्या तरी माझ्याकडे कुठलं माध्यम नाही ज्यामध्ये मी राजकारणाविषयी सखोलपणे लिहून किंवा बोलू शकेन. पण एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून एक नागरिक म्हणून माझं स्वतःचं सध्याच्या राजकारणाविषयी नेहमी मत असतं.

सायली संजीव ही मूळची धुळ्याची आहे आणि तिचं सगळं शिक्षण नाशिकमध्ये झालं. राज्यशास्त्रात जरी तिने पदवी संपादन केली असली तरी अभिनय तिला खुणावत होता आणि एकांकिका ,नाटक मालिका, सिनेमा या माध्यमात सायलीने तिच्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली काहे. काहे दिया परदेस ही तिची पहिलीच मालिका खूप गाजली. सध्या ती शुभमंगल ऑनलाइन या मालिकेत सुयश टिळकसोबत काम करत आहे. याशिवाय तिचा बस्ता हा सिनेमा लवकरच पडद्यावर झळकणार आहे. सातारचा सलमान या सिनेमातही सायलीने काम केलं होतं. विविध जाहिरातींमध्येही सायलीचा चेहरा प्रेक्षकांनी पाहिला आहे. मनोरंजन क्षेत्रामध्ये घोडदौड करत असलेली सायली भविष्यात कधीतरी राजकीय विश्लेषक म्हणून लिहिती झाली तर नक्कीच आश्चर्य वाटायला नको.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER