‘ती सज्ञान आहे तिच्या मर्जीने ती कोणाच्याही सोबत जाऊ शकते’

Couple - Bombay High Court
  • मुंबई हायकोर्टाने प्रेमी युगलास दिले संरक्षण

मुंबई : वयाने १८ वर्षांहून अधिक व म्हणून कायद्याने सज्ञान मूलीस कोणाच्याही बरोबर, कुठेही जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे व या तिच्या स्वातंत्र्यास त्या मुलीचे पालक तर सोडाच, पण न्यायालयही आडकाठी करू शकत नाही, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एका प्रेमी युगलास पोलीस संरक्षण देण्याचा आदेश दिला.

’एमबीए’च्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने केलेल्या ‘हेबियस कॉर्प्स’ याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्या. शिवाजी संभाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे तोंडी निरीक्षण नोंदविले. आपल्या २३ वर्षांच्या प्रेयसीला तिच्या पालकांनी बळजबरीने डांबून ठेवले आहे, असे या तरुणाचे म्हणणे होते व त्यांच्या ताब्यातून तिला सोडविण्यासाठी त्याने ही याचिका केली होती.

या तरुणाने न्यायालयास सांगितले की, माझ्या प्रेयसीच्या वडिलांचा आमच्या लग्नास विरोध आहे म्हणून आम्ही दोघे मदतीसाठी पोलिसांकडे गेलो. पण पोलिसांनी मदत करण्याऐवजी प्रेयसीला तिच्या पालकांच्या हवाली केले.

खंडपीठाने आधीच्या तारखेला दिलेल्या आदेशानुसार याचिकाकर्त्याच्या या प्रेयसीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिचे आई-वडिलही हजर होते. न्यायालयाने जेव्हा या मुलीला तिची इच्छा विचारली तेव्हा तिने सांगितले की, आमचे गेली पाच वर्षे प्रेमसंबंध आहेत व मला आयुष्यभर त्याच्याच (याचिकाकर्ता) बरोबर राहायचे आहे. आमच्या प्रेमाविषयी समजले तेव्हा माझ्या आई-वडिलांनी माझा मोबाईल फोन फोडून टाकला व मला घरात कोंडून ठेवले, असेही तिने सांगितले.

‘न्यायमूर्ती महोदय, ती लग्न न करताच त्याच्यासोबत जन्मभर राहायचे म्हणते आहे’ असे सांगत पब्लिक प्रॉसिक्युटरने विरोधाचा सूर लावला. पण त्यांना मध्येच थांबवत न्या. शिंदे त्यांना म्हणाले, ‘ ती कायद्याने सज्ञान आहे व त्यामुळे ती तिच्या इच्छेनुसार कुठेही जाऊ शकते. तिच्या या स्वातंत्र्यावर आम्ही किंवा तिचे पालकही बंधने घालू शकत नाहीत. वयाला १८ वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती तिच्या मर्जीनुसार कुठेही राहू/जाऊ शकते, असे कायदा स्पष्टपणे सांगतो.

मजेची गोष्ट म्हणजे न्यायमूर्ती हे सांगत असतानाही कोर्टात शेवटच्या रांगेतील खुर्चीवर बसलेली ही मुलगी तिच्या प्रियकराशी कोणताही संवाद करू शकणार नाही, याची खबरदारी तिच्या सोबत सलेली महिला पोलीस कटाक्षाने घेत होती!

नंतर न्यायमूर्तींनी त्या मुलीच्या वडिलांना समोर बोलावून त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले. त्या दोघांचे प्रेमसंबंध आपल्याला पसंत नाहीत व त्यांनी लग्न करण्यास आपला विरोध आहे, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले. त्यांची हिंदीत समजूत घालत दोन्ही न्यायमूर्ती त्यांना म्हणाले की, तुमच्या भावना व हेतू आम्ही समजू शकतो. पण ती कायद्याने सज्ञान आहे. उद्या एखाद्या न्यायाधीशाच्या सज्ञान मुलीचे प्रकरण जरी आमच्यापुढे आले तरी आम्ही त्यात काहीच करू शकणार नाही!

ँंँंपोलिसांनी या प्रेमी युगलास त्यांना जेथे कुठे जायचे असेल तेथपर्यंत सुखरूप जाण्यासाठी संरक्षण द्यावे, असा आदेश देत खंडपीठाने याचिका निकाली काढली.

(टीप: या प्रकरणातील प्रेमी युगलास खासगी आयुष्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांची किंवा मुलीच्या आईवडिलांची नावे बातमीत दिलेली नाहीत.)

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER