काँग्रेसचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडा, शशी थरूर यांची सूचना

Shashi Tharoor

नवी दिल्ली : काँग्रेसला उभारी द्यायची असेल तर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडा, अशी सूचना काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी पुन्हा केली आहे.

दिल्लीच्या दिवंगत मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांनी काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळत नसल्याबद्दल वरिष्ठ नेत्यांना जबाबदार धरलं होतं. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शशी थरूर म्हणाले की काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात यावी. अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकायची याची भीती वरिष्ठ नेत्यांना असल्याचा आरोप संदीप दीक्षित यांनी केला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा जाहीर वाद सुरू झाले आहेत. शशी थरुर यांनी यापूर्वीही अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची सूचना केली होती. यावेळी ते म्हणाले, ‘संदीपने जे मत जाहीरपणे व्यक्त केले, तेच मत देशभरातील कार्यकर्ते आणि काही वरिष्ठ नेतेही खाजगीत व्यक्त करत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी अशी काँग्रेस कार्यकारिणीला विनंती आहे.’

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान कोण करणार याचे उत्तर शशी थरुर यांनी दिले. ‘काही जण म्हणतात कुणी आणि कशासाठी मतदान करावे. अखिल भारतीय काँग्रेस समिती आणि पीसीसीच्या देशभरातील १० हजार सदस्यांनी मतदान करावे असे मी आठ महिन्यांपूर्वी सांगितले होते. मतदानाचा अधिकार समितीमधील निर्वाचित सदस्यांना असावा’, असे शशी थरुर म्हणाले.