शशांक करणार बिझनेसची हॅट्रिक

Shashank Ketkar

कोणतीही व्यक्ती त्याच्या आयुष्यात फार फार तर एक, दोन , किंवा तीन प्रोफेशनचा अनुभव घेत असेल पण तीच व्यक्ती जर अभिनेता किंवा अभिनेत्री असेल तर ती त्याच्या पडद्यावरच्या आयुष्यामध्ये अनेक प्रोफेशन भूमिकांच्या माध्यमातून साकारत असते. अनेकदा तर असं होतं की एखादा कलाकार एखाद्या व्यक्तिरेखेसाठीच फिट असतो. म्हणजे प्रेक्षकांना किंवा त्या कलाकाराच्या चाहत्यांनादेखील त्याला त्याच गेटअपमध्ये बघायला खूप आवडतं. कलाकार कितीही म्हणत असले की मला त्याच त्याच भूमिकांमध्ये अडकायचं नाही तरीही कलाकारांसमोर ती भूमिका चालून येते आणि मग ती नाकारण्याचा प्रश्नच येत नाही इतके ते कलाकार त्या भूमिकेशी एकरूप वाटत असतात. अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा त्याच्या मालिका जगतातली बिझनेसमन या भूमिकेची लवकरच हॅट्रीक करणार आहे. शशांक आतापर्यंत चार मालिकांमध्ये दिसला असून त्यापैकी तीन मालिकामधील त्याची व्यक्तिरेखा ही उच्चभ्रू आणि यशस्वी उद्योजक अशीच आहे. लवकरच त्याची एक नवीन मालिका येणार आहे ज्यामध्ये तो बिझनेसमन साकारत आहे आणि या भूमिकेच्या निमित्ताने शशांकची बिझनेस मन म्हणून ऑनस्क्रीन हॅट्रिक होणार आहे.

सुखाच्या सरिनी हे मन बावरे ही मालिका दोन महिन्यांपूर्वीच संपली. त्यानंतर शशांक आता नव्या भूमिकेत कधी पाहायला मिळणार अशी उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागून राहिली होती.काही दिवसापासून शशांकच्या नव्या मालिकेचे प्रोमो झळकायला सुरुवात झाली आहे. यावरून तरी शशांक त्याच्या नव्या मालिकेत बिजनेसमनची म्हणजे भूमिका साकारत असल्याचा स्पष्ट अंदाज त्याच्या चाहत्यांना आला आहे.आता हा बिजनेसमन कसा असेल याचे वेध शशांकच्या चाहत्यांना लागले आहेत. .

होणार सुन मी या घरची या मालिकेतील श्री म्हणजे गोखले उद्योग समूहाचा मालक श्री गोखले ही भूमिका साकारली होती. त्याची पहिलीच मालिका होती आणि त्यातील त्याची तरुण उद्योजक ही भूमिका त्याचा चाहता वर्ग निर्माण करण्यात महत्त्वाची ठरली. ही मालिका प्रचंड गाजली. सुखाच्या सरिनी हे मन बावरे या मालिकेतील सिद्धार्थ तत्ववादी नावाच्या उद्योजकाची भूमिकाही शशांकला अगदी फिट्ट बसली. या मालिकेतील उद्योजक शांत समजूतदार आणि संयमी होता. मात्र सुखाच्या सरिनी हे मन बावरे या मालिकेत शशांकने वठवलेला उद्योजक एखाद्या गोष्टीवर पटकन राग येणारा स्वभाव असलेला होता. आता नव्याने येणाऱ्या पाहिले न मी तुला या मालिकेत शशांकचा लूक एखाद्या उद्योजकाला साजेसा असा आहे. सध्यातरी या नव्या मालिकेतील उद्योजक हा त्याच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधणारा आहे असं प्रोमोवरून दिसून येत आहे. या उद्योजकाला अजून काय कंगोरे आहेत हे शशांकची मालिका सुरू झाल्यानंतरच कळेल. तोपर्यंत शशांकची नवी मालिका कधी येते याची वाट बघणाऱ्या त्याच्या चाहत्यांना शशांकचा नवा उद्योजक पाहण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.

शशांक केतकर काही दिवसापूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेत आला होता. अनेक निर्माते हे कलाकारांचे मानधन थकवतात ही गोष्ट चुकीची असून यासाठी निर्मात्यांना गुन्हेगार म्हटले पाहिजे अशी रोखठोक पोस्ट करत शशांकने नवा मुद्दा चर्चेला आणला होता. तो सतत अनेक सामाजिक गोष्टींवर भाष्य करत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो सतत चाहत्यांशी संवाद साधत असतो. शशांक एक आंतरराष्ट्रीय जलतरणपटू असून त्याने ऑस्ट्रेलियात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. मात्र त्याला अभिनयाची गोडी लागली आणि त्याने अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचं ठरवलं. होणार सुन मी या घरची या मालिकेपासून त्याच्या अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. आत्तापर्यंत त्याने होणार सुन मी या घरची, सुखाच्या सरिनी हे मन बावरे, आणि इथेच टाका तम्बू या मालिका केल्या असून या तीनही मालिकेत त्याच्या भूमिका गाजल्या होत्या. शिवाय कुसुम मनोहर लेले आणि गोष्ट तशी गमतीची या दोन नाटकातही शशांकने उत्तम काम करत रंगभूमी गाजवली आहे. ते 31 दिवस या सिनेमात त्याने वेगळ्या धाटणीची भूमिका केली होती. वनवे तिकीट हा सिनेमाही त्याच्या मोठ्या पडद्यावरच्या पदार्पणाला साजेसा ठरला होता.

शशांक सांगतो, सिनेमा नाटक आणि मालिका या तीनही माध्यमात काम केल्या नंतर एक गोष्ट जाणवली की प्रत्येक माध्यमाची एक वेगळी जबाबदारी आहे. प्रत्येक माध्यमात काम करण्याचा अनुभव वेगळा आहे. काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे नक्कीच तुलना करता येणार नाही. पण मालिकामध्ये काम करत असताना अधिकाधिक घराघरात पोहोचता येतं. त्यामुळे मालिका हे माझं नेहमीच पहिलं प्रेम आहे. मी आतापर्यंत तीन मालिकांमध्ये उद्योजक ही भूमिका रंगवली असली तरी प्रत्येक उद्योजकाचा एक वेगळा बाज होता. त्याचा स्वभाव असेल किंवा त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल या प्रत्येकाचे पैलू त्या व्यक्तिरेखांमध्ये आणण्याचा मी अभिनेता म्हणून प्रयत्न केला. नव्या मालिकेतही उद्योजक ही व्यक्तिरेखा मी आधी दोन मालिकेत केलेली आहे त्याप्रमाणेच असली तरी या कथेमधला उद्योजक हा खूप वेगळा असणार आहे आणि त्यामुळेच त्याचा वेगळा अभ्यास केला आहे. त्यामुळे जरी उद्योजक या भूमिकेची हॅट्रिक करत असलो तरी या नव्या मालिकेत उद्योजक साकारत असताना प्रेक्षकांना आणि माझ्या चाहत्यांना त्यामध्ये वेगळेपण नक्की दिसेल याचा अभिनेता म्हणून प्रयत्न करेन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER