शशांक धावला मदतीला

शशांक केतकर

अडचणीच्या काळात मित्राचा आधार नेहमीच मोठा वाटत असतो. मैत्री हे असं नातं आहे की जिथे कोणताही स्वार्थ नसतो. आयुष्यात असे मित्र असणं खूप महत्त्वाचं आहे. ग्लॅमर, वलय बाजूला ठेवून जेव्हा मैत्रीचं नातं जपलं जातं तेव्हा त्याला आणखीनच मोल येतं. आज आपण मैत्रीविषयी इतकं भरभरून यासाठी बोलतोय की सेलिब्रिटीची झूल बाजूला ठेवून अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) त्याच्या जिवलग मैत्रिणीच्या मदतीसाठी त्याच्या चाहत्यांना आवाहन करत आहे. केवळ सोशल मीडियावरच्या (Social Media) लाखो फॅन्सपर्यंत आपले फोटो, अपडेट देण्यापलीकडे शशांकने त्याच्या सोशल मीडिया पेजचा वापर त्याच्या मैत्रिणीच्या वडिलांना मेडिकल हेल्प मिळावी म्हणून केला आहे.

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील ‘श्री’ हे नाव अभिनयाने घराघरांत पोहचवणारा शशांक केतकर सध्या मालिका, नाटक आणि सिनेमा या तीनही माध्यमांतील प्रसिद्ध नाव आहे. सध्या त्याची ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिकाही लोकप्रिय आहे. ‘इथेच टाका तंबू’ या मालिकेतील त्याची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. ‘कुसुम मनोहर लेले’, ‘गोष्ट तशी गमतीची’ ही नाटकं, ‘३१ दिवस’, ‘वन वे तिकीट’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमांतही शशांकच्या अभिनयाचे कौतुक झाले. ऑस्ट्रेलियातून इंजिनीअरिंगचे शिक्षण (Engineering education) पूर्ण करूनही शशांकने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला; शिवाय शशांक एक नॅशनल स्वीमरदेखील आहे.

मूळचा पुण्याचा असलेल्या शशांकचा मित्रपरिवार प्रचंड मोठा आहे. जेव्हा शूटिंगमधून वेळ मिळतो तेव्हा तो त्याच्या मित्रमंडळीत रमतो. एकमेकांना काहीही अडचण आली तर शशांकच्या मित्रमैत्रिणींचा चमू मदतीला नेहमीच तयार असतात. चार दिवसांपूर्वी शशांकने त्याच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. मात्र हा व्हिडीओ म्हणजे शशांकच्या नव्या मालिकेविषयी किंवा त्याच्या सध्याच्या मालिकेत पुढे काय ट्विस्ट येणार आहे किंवा त्याच्या इंडिड या यू-ट्यूब चॅनलवरच्या नव्या व्हिडीओची माहिती देणारा नाही तर त्याच्या एका खास मैत्रिणीवर आलेल्या संकटात तिला मदत करण्याचे आवाहन करणारा आहे.

या व्हिडीओत शशांक म्हणतोय की, माझी एक मैत्रीण सध्या विचित्र परिस्थितीशी सामना करत आहे. तिच्या वडिलांना काही दिवसांपूर्वी तब्येतीचा त्रास सुरू झाला. निदान झालं ते त्यांच्या किडनीविकाराचे. तातडीने त्यांना दवाखान्यात बेड मिळावा यासाठी आम्ही मित्रांनी खूप धडपड केली. आमच्या प्रयत्नांना यश आले आणि तिच्या वडिलांना बेड मिळाला. सुदैवाने त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. सध्याच्या कोरोना काळात माझ्या मैत्रिणीला हेच टेन्शन होतं की इतक्या आजारपणात वडिलांना कोरोनाची लागण होऊ नये. पहिला दिलासा त्यांच्या टेस्टच्या अहवालाने आला. मात्र किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज असल्याने ऑपरेशन आणि किडनीदात्याचा शोध यामध्ये तिची आणि आम्हा मित्रपरिवाराची धावपळ झाली. खरं तर या सगळ्या संकटात देव तिच्यासोबत आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आली ती तिच्या वडिलांसाठी काकांनी किडनीदाता म्हणून तयारी दर्शवली. सगळ्या टेस्ट झाल्या आणि काकांकडून तिच्या वडिलांना किडनी मिळाली. वडिलांच्या जीवावरचा धोका टळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता वडिलांची काळजी दूर झाली असली तरी या सगळ्यासाठी जवळपास २० लाख रुपयांचा खर्च आला आहे. कुणासाठीही वडील हा खूप मोठा आधार असतो. माझ्या मैत्रिणीचे आणि तिच्या वडिलांचे बाँडिंग मला माहीत आहे. तिने प्रयत्न करून काही पैसे जमवले आहेत. शिवाय आम्ही मित्रमैत्रिणींनीही आर्थिक हातभार लावला आहे. पण अजूनही खर्च आटोक्यात आलेला नसल्याने शशांकने पुढाकार घेतला आहे.

आपण बाहेर एक वडा खाल्ला तरी वीस रुपये खर्च करतो. नाष्टा, कॉफीचेच शंभर रुपये सहज मोडले जातात. एका वेळचे पार्सल जरी हॉटेलमधून आणले तरी हजार रुपये संपतात. माझे लाखो फॅन्स फॉलोअर्स आहात तुम्ही. तुम्ही एक वेळचा नाष्ट्याचा खर्च जर माझ्या मैत्रिणीच्या मदतीसाठी दिला तरी खूप आहे. अगदी दहा रुपयांपासून तुमची मदत तिच्यासाठी खूप आधाराची ठरेल, अशा शब्दांत शशांकने त्याच्या इन्स्टा पेजवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. मदत कुठे करायची याचे डिटेल्सही दिले आहेत. आपल्या प्रसिद्धीचा असा सुयोग्य वापर शशांकने त्याच्या मैत्रिणीच्या डोक्यावर वडिलांचे छत्र राहावे यासाठी केला आहे. शशांक आणि त्याचे वडील यांचं नातंही अगदी मित्रासारखं आहे. या जाणिवेतूनच शशांकने मैत्रिणीसाठी त्याच्या चाहत्यांकडे काही तरी मागितलं आहे… जर खरंच शशांकच्या विनंतीला मान देत त्याच्या चाहत्यांनी मदतीचा हात दिला तर सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते हा केवळ टाइमपास नसून त्यातून काही तरी चांगले घडू शकते हे दाखवणारे उदाहरण म्हणून पाहिले जाईल.

ही बातमी पण वाचा :  शशांक धावला मदतीला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER