शशांक होणार बाबा

Shashank Ketkar

आपण लहानपणापासून आपल्या कल्पनेच्या जगात हे नेहमीच अनुभवले आहे की 25 डिसेंबरच्या सकाळी आपला आवडता सांताक्लॉज आपल्यासाठी काहीतरी भेट घेऊन येत असतो. अर्थात त्या नकळत्या वयात सांताची भेट काय असेल, याची वेगळीच उत्सुकता असते. असा हा सांता प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी डोकावतोच. सध्या अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याला यंदा सांताने अशी भेट दिली आहे की ती भेट शशांक आणि त्याची बायको प्रियांका यांच्यासाठी सगळ्यात मौल्यवान असणार आहे.

शशांक आणि प्रियांका यांच्या आयुष्यात आता तिसरी गोड व्यक्ती येणार असून लवकरच शशांक खऱ्या आयुष्यात बाबा होणार आहे. त्याने हा आनंददायी क्षण प्रियांका समवेतच्या फोटोसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे. नव्या वर्षाच्या आम्हा तिघांकडून शुभेच्छा अशी हटके लाईन देत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेनंतर सध्या निवांत वेळ घालवणाऱ्या शशांकने नाताळच्या पूर्वसंध्येला केतकरांच्या घरात नवा पाहुणा येणार असल्याची बातमी शेअर केली आहे.

अभिनेते -कलाकार हे मालिकांमध्ये ऑनस्क्रीन अनेकदा मै तेरे बच्चे की मा बंने वाली हू हा डायलॉग ऐकत असतात. बाबा होणार असल्याचे कितीतरी सीन सिनेमा आणि मालिकांमध्ये शशांकने शूट केले आहेत पण खऱ्या आयुष्यामध्ये आता शशांक बाबा होणार आहे ही भावना त्याच्यासाठी खूप आनंदाची आहे. शशांकने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्याने प्रियांकाच्या पोटाशी कान लावत होणाऱ्या बाळाशी हितगूज करत असलेली भावमुद्रा टिपली आहे. या फोटोसोबत लिहिलेल्या ओळींमध्ये शशांक म्हणतो, अनेक भेटवस्तू आणि आनंद घेऊन सांताक्लॉज आपल्या आयुष्यामध्ये येत असतो. प्रत्येक व्यक्तीला भेटवस्तू आवडते आणि जेव्हा ती भेट सांताक्लॉजकडून मिळते तेव्हा त्यात वेगळीच मजा असते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे माझ्या आयुष्यात यंदाचा नाताळ हा अशीच अनोखी भेट घेऊन आला आहे. प्रियांका आई आणि मी बाबा होणार आहे.

दोन वर्षांपूर्वी शशांक आणि प्रियांका यांचा लग्न झालं. शशांक आणि प्रियांका हे खूप जुने मित्र होते. त्यांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली. मात्र मध्यंतरी दोघेही आपापल्या कामात व्यस्त राहिले. आणि त्यांचा संपर्क कमी झाला होता. दरम्यान शशांक आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांचा घटस्फोट झाल्यानंतर काही निमित्ताने प्रियांका आणि शशांक यांचे बोलणं सुरू झालं. त्यानंतर पुन्हा शशांक आणि प्रियांका एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांमध्ये अनेक कॉमन गोष्टी आहेत ज्यामुळे ही दोघं एकत्र आली ज्यामध्ये शशांक आणि प्रियंका या दोघांनाही प्राण्यांवर प्रेम करायला प्रचंड आवडतं. प्रियांका ही व्यवसायाने वकील आहे. प्रियांका आणि शशांक हे सतत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेले कपल आहे. वेगवेगळ्या सणासुदीचे तसेच भटकंतीचे फोटो ही जोडी सातत्याने शेअर करत असते आणि त्यांच्या चाहत्यांना पर्यंत हे फोटो पोहोचवत असते.

लॉकडाऊन काळामध्ये शशांकने इंडिड कँडीड नावाचे युट्युब चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलवर शशांक वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो. मध्यंतरी डोंबिवलीमध्ये कापडी पिशव्या विकून घर चालवणाऱ्या एका आजोबांची स्टोरी कोणीतरी शेअर केली होती. शशांक आणि प्रियांका त्या आजोबांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्याशी संवाद साधला. शशांक आणि प्रियांकाने केलेल्या या व्हिडिओला इतका प्रतिसाद मिळाला की त्या आजोबांच्या पिशव्या विक्रीचा व्यवसाय वाढला. इतकेच नव्हे तर शशांक सतत सोशल गोष्टीशी निगडित काम करत असतो. त्याच्या मैत्रिणीचे बाबा किडनी विकाराने त्रस्त होते आणि त्यांचा ऑपरेशन करण्याची गरज निर्माण झाली तेव्हा शशांकने त्याच्या सोशल मीडिया पेजवरून आपल्या मैत्रिणीच्या बाबांना आर्थिक मदत करावी असे आवाहन केलं होतं आणि त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्याच्या चाहत्यांनी आपली मदत त्याच्या मैत्रिणीपर्यंत पोहोचली होती. शशांक नेहमी म्हणतो की जर सेलिब्रिटी म्हणून माझं जे वलय आहे , जी क्रेझ आहे त्याचा उपयोग जर माझ्या आवाहनामुळे, माझ्या बोलण्यामुळे जर गरजू व्यक्तींना होत असेल तर कलाकार म्हणून ही सगळ्यात समाधान देणारी गोष्ट आहे. शशांकच्या व्यक्तिमत्त्वाची ही बाजू खूप कमी जणांना माहित आहे.

होणार सून मी या घरची या मालिकेमध्ये श्रीरंग गोखले अर्थात श्री ही व्यक्तिरेखा शशांकने त्यांच्या अभिनयाने तुफान लोकप्रिय केली होती. त्यानंतर इथेच टाका तंबू, सुखाच्या सरींनी हे मन बावरे या त्याच्या मालिकाही खूप गाजल्या. ते 31 दिवस, वन वे तिकीट या सिनेमातही शशांक मुख्य नायकाच्या भूमिकेत होता. शशांकचा असा खास चाहता वर्ग आहे. मालिकेमध्ये दिसणारा एक सोज्वळ आणि सभ्य नायक अशी प्रतिमा आजवरच्या भूमिकांमधून अधोरेखित केली आहे. शशांक उत्तम जलतरणपटू असून त्याने आजवर अनेक बक्षिसेही मिळवली आहेत. खरेतर शशांकने त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण ऑस्ट्रेलिया येथून पूर्ण केलं. मात्र अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आणि म्हणूनच त्याने त्याचे करिअर हे अभिनय क्षेत्रातच केलं. कुसुम मनोहर लेले आणि गोष्ट तशी गमतीची या दोन नाटकांमधून शशांक व्यावसायिक रंगभूमीवर दिसला होता. सध्या त्याच्या नाटकाचे प्रयोग थांबले आहेत. मात्र लवकरच तो मालिकेत दिसण्याची शक्यता आहे. सध्यातरी आता त्याच्याकडे कुठली भूमिका आहे, कोणती नवीन मालिका येणार आहे या सगळ्या बातम्यांपेक्षा खऱ्या आयुष्यामध्ये शशांक लवकरच वडिलांची भूमिका निभावणार आहे हीच त्याच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. गेल्या चार पाच महिन्यांमध्ये कलाकारांपैकी अनेक अभिनेत्यांनी त्यांच्याकडे गोड बातमी असल्याची वार्ता चाहत्यांना दिली होती. याच पंक्तीत आता अभिनेता शशांक केतकर हा देखील येऊन बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER