शशांक निर्मात्यांवर बरसला

मालिकेचे कथानक पडद्यावर जरी मनोरंजन करत असली तरी या मालिकांच्यापडद्या मागे बऱ्याच गोष्टी धुमसत असतात. मालिकेतील पात्र वठवणारा कलाकार अचानक बदलल्याचं प्रेक्षकांसमोर येतं तेव्हा त्या कलाकाराच्या वैयक्तिक अडचणी असतात हे खरे आहे. पण निर्माते आणि त्या कलाकारांमधील वादच अनेकदा कारणीभूत ठरत असतात. बहुतांशी वेळा हा वाद आर्थिक असतो. करारानुसार मानधन दिलं नाही की मग कलाकार ती मालिका कोणतीही नोटीस न देता सोडून देतात तर कधीकधी कलाकार निर्मात्यांना नाहक त्रास देतात आणि त्यामुळे निर्माते त्यांना मालिकेतून काढून त्यांच्या जागी दुसरा कलाकार आणतात. अशा या पडद्यामागच्या घडामोडी गेल्या काही दिवसात प्रेक्षकांपर्यंत वेगवेगळ्या चर्चांच्या माध्यमातून पोहोचत आहेत. सध्या हा विषय चर्चेला येण्याचे कारण म्हणजे अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याने कलाकारांचे मानधन थकवणाऱ्या निर्मात्यांना थेट गुन्हेगारांच्या पंक्तीत बसवलं आहे. सोशल मीडियावर शशांकने हे विधान केले असून त्याच्या या विधानाला दुजोरा देणाऱ्या अनेक कमेंट्स त्याच्यापर्यंत पोहोचत आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आई माझी काळुबाई या मालिकेच्या निर्मात्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी आपले मानधन दिले नसल्याचा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. दोन महिन्यापूर्वी आई माझी काळुबाई ही मालिका प्राजक्ता करत होती. या मालिकेतील आर्या या प्रमुख भूमिकेत प्राजक्ता दिसत होती. परंतु प्राजक्ता आणि अलका कुबल यांचे वाद झाल्याने तिने ही मालिका सोडली. आता तिच्या जागी अभिनेत्री वीणा जगताप ही भूमिका करत आहे. पण आर्या म्हणून भूमिका केलेल्या कामाचे मानधन अलका कुबल यांनी दिले नसल्याचे प्राजक्ता हिने जाहीर सांगितल्यामुळे हा प्रश्न आणि छोट्या पडद्यामागे होणाऱ्या मानधनावरून होणाऱ्या या वादाची ठिणगी सोशल मीडियावर पडली. अर्थात अलका कुबल यांनी दोन महिन्याचे मानधन प्राजक्ताला दिल्याचं प्रत्युत्तरादाखल सांगितलं. पण मालिकेच्या कथेत सगळच छानछौकी पाहत असलेल्या प्रेक्षकांना या इंडस्ट्रीची एक वेगळी बाजू देखील कळाली. याच मुद्द्यावरून अभिनेता शशांक केतकर याने त्याच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शशांक असे म्हणतो, अनेकदा मालिकांच्या निर्मात्यांकडून कलाकारांचे मानधन थकवलं जातं. गेल्यावर्षी मार्चच्या मध्यापासून मनोरंजन क्षेत्रालादेखील लॉकडाउनचा फटका बसला. त्यानंतर जुलैमध्ये मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. कलाकारांनी चित्रीकरण सुरू होताच निर्मात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सेटवर हजेरी लावली आणि तेव्हापासून सगळे कलाकार मालिकांसाठी 12 ते 14 तास काम करत आहेत. परंतु काही मालिकांच्या निर्मात्यांनी कलाकारांना गेल्या तीन-चार महिन्यातलं मानधन दिले नाही. निर्मात्यांकडून नेहमी अशी एक अडचण सांगितली जाते की आमचा आर्थिक प्रॉब्लेम आहे. पण मग आम्ही कलाकार काय कुबेराचे मित्र आहोत का ? त्यांनाही अडचणी असू शकतात याचा विचार निर्मात्यांनी केला पाहिजे. मुळातच मालिकांमध्ये कलाकारांना आर्थिक मानधन देण्याचे सत्र हे तिमाही आहे. त्यात जर तीन महिन्यानंतरही कलाकारांना मानधन थकवले गेलं तर त्यातून होणाऱ्या आर्थिक समस्या कलाकारांना भोगावे लागत असतात.

निर्मात्यांनी जेव्हा एखादी मालिका करायची ठरवलेलं असतं तेव्हा त्याच्यासाठीची आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. कलाकारांचे मानधन थकवणे हा त्यावरचा पर्याय किंवा उपाय होऊ शकत नाही. शशांकने (Shashank Ketkar) केलेल्या या विधानाची चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. मी टू या चळवळीप्रमाणे थकीत मानधनाचा फटका बसलेल्या अनेक कलाकारांनी शशांकच्या या विधानाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न आणि निर्मात्याची भूमिका हा विषय चांगलाच गाजणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वीही अनेक कलाकारांनी थकित मानधनाच्या विरोधात आवाज उठवला होता. कलाकार अचानक भूमिका सोडतात, त्यानंतर त्यांच्या जागी दुसरा कलाकार ती भूमिका करताना दिसतो हा बदल जरी प्रेक्षकांकडून स्वीकारला जात असला तरी त्यामागे असलेला कलाकारांचे थकित मानधन हा प्रश्न उरतोच असे चित्र मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये दिसून येते. एखादी मालिका प्रेक्षकांना आवडेल की नाही यावर त्या मालिकेचा टीआरपी अवलंबून असतो. त्यामुळे निर्माते मालिकांची सुरुवात करतात तेव्हा ती मालिका चांगली चालते. परंतु नंतर जर ती मालिका रटाळ झाली तर त्याचा टीआरपीवर परिणाम होतो. याचीच कारणं देत निर्मात्यांकडून अनेकदा कलाकारांचे मानधन थकवलं जातं. याच गोष्टीला शशांकने विरोध केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार मालिकेतील कलाकार देखील ती भूमिका चांगली होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. जवळपास दिवसभरातील 12 ते 18 तास देत असतात. एखादी मालिका टीआरपीवर चालली नाही किंवा तिला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला नाही याचा दोष हा फक्त कलाकारांचा नसतो तर याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामुळे निर्मात्यांनी मालिकेच्या अपयशाचं खापर कलाकारांच्या डोक्यावर फोडून त्यांचे मानधन थकवणंहे योग्य नाही. असं करणारे निर्माते हे गुन्हेगारच आहेत .

होणार सून मी या घरची या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलेल्या शशांकने गेल्या दहा वर्षात अभिनय क्षेत्रात चांगलीच मजल मारली आहे. नुकतीच त्याची सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका संपली. या मालिकेनेदेखील शशांक घराघरात पोहोचला होता याशिवाय इथेच टाका तंबू या मालिकेतील शशांकचा अभिनय त्याच्या चाहत्यांना आवडला होता. गोष्ट तशी गमतीची आणि कुसुम मनोहर लेले या दोन नाटकांच्या माध्यमातून रंगमंचावरील शशांकचं पदार्पणही दणक्यात झालं. ते 31 दिवस या सिनेमात मयुरी देशमुखसोबत शशांकची जोडी प्रेक्षकांना आवडली तर वनवे तिकीट या सिनेमात शशांकने हॅपी गो लकी तरुणाची भूमिका साकारली होती जी त्याच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतली होती.

अभिनयासोबत शशांक सोशल मीडियावर सतत ॲक्टिव असतो. इंडीड कँडीड या यूट्यूब चैनलवर रेसिपी पासून गाण्यापर्यंतचे वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करत असतो. लवकरच शशांक बाबा होणार असून सध्या तो त्याची बायको प्रियंका हिची काळजी घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER