शशांक आणि आशयची अदलाबदली

shashank ketkar -Aashay Kulkarni

एखाद्या अभिनेत्यावर आयुष्यभरासाठी चॉकलेट हिरो अशी छाप पडते. आपण नेहमीच बघतो की काही कलाकार नेहमीच असे सोज्वळ आणि गुडबॉय रोल साकारण्यास पसंती देतात. पण काही कलाकारांना मात्र जाणीवपूर्वक ही चौकट मोडून आपण इतर वेगळ्या धाटणीचे रोलही करु शकतो हे दाखवून द्यायचं असतं. अशीच संधी ‘ पाहिले न मी तुला’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) आणि आशय कुलकर्णी (Ashay Kulkarni) या दोघांना एकत्रच मिळाली आहे. शशांक आणि आशय दोघही पुणेकर आहेत आणि बारा-तेरा वर्षांपूर्वी जेव्हा हे दोघेही पुण्यात नाटक करत होते तेव्हा एका नाटकात या दोघांनी एकत्र काम केलं होतं. जवळपास आता एक तपानंतर ही जोडी पुन्हा एकत्र ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत दिसत आहे. पण या मालिकेत ही जोडगोळी एकत्र आली असली तरी बारा वर्षांपूर्वी त्यांनी ज्या नाटकात एकत्र काम केलं होतं त्या नाटकातील भूमिकेची अदलाबदल झाली आहे.

ही गोष्ट दोघांनाही खूप भारी वाटते की इतक्या वर्षांनी ते एकत्र काम करत असताना वेगळं काहीतरी करता येतय. नुकताच या दोघांनी हा किस्सा शेअर केला आणि या नव्या मालिकेतील भूमिकेच्या निमित्ताने दोघांचाही मनातली भूमिका करायला मिळाली याचा आनंद व्यक्त केला. शशांक केतकर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक समंजस, सोज्वळ मोठ्यांचं ऐकणारा, सगळ्यांचे मन जपणारा असा नायक म्हणून डोळ्यासमोर येतो. अर्थातच आजवरच्या प्रत्येक मालिकेत त्याने अशीच भूमिका साकारली आहे. होणार सुन मी या घरची ही शशांकची पहिली मालिका. या मालिकेमध्ये तो अत्यंत समंजस आणि प्रेमळ मुलगा आणि नवरा दाखवण्यात आला होता. त्यानंतर इथेच टाका तंबू या मालिकेतही शशांकची भूमिका अशीच समंजस मुलाची होती. काही महिन्यांपूर्वीच संपलेल्या सुखाच्या सरिनी हे मन बावरे या मालिकेत शशांकने साकारलेला सिद्धार्थ तत्ववादी हा श्रीमंत घरातला मुलगा असूनही अत्यंत समंजस आणि सगळ्यांचा आदर करणारा असा दाखवला होता. त्यामुळे आतापर्यंतच्या तिन्ही मालिकांमध्ये गुड बॉय म्हणजे शशांक केतकर हे समीकरण इतकं घट्ट झालं होतं की जेव्हा शशांकला पाहिले न मी तुला या मालिकेमध्ये खलनायक म्हणून व्यक्तीरेखा रंगवण्याची ऑफर आली तेव्हा त्याने कुठलाही विचार न करता ऑफर स्वीकारली.

आशय सांगतो की यापूर्वीच्या माझा होशील ना या माझ्या मालिकेत प्रेक्षक मला खूप शिव्या घालत होते. खरे तर एखाद्या व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांनी राग व्यक्त करणं हे ही त्या व्यक्तिरेखेला मिळालेली पावती असते आणि त्यादृष्टीने जर बघायचं झालं तर माझा होशील ना या मालिकेतील मी वठवलेल्या डॉक्टर सुयश या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी खूप शिव्या घातल्या. पण लगेच मी पाहिले न मी तुला या मालिकेत एक चांगला मुलगा म्हणून समोर येत आहे. कलाकार म्हणून मला कुठल्याही साच्यात न अडकण्यासाठी ही चांगली संधी होती त्यामुळे ही ऑफर नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.

शशांक केतकर आणि आशय कुलकर्णी या दोघांच्याही या नव्या मालिकेच्या निमित्ताने पुण्यात असताना १२ वर्षांपूर्वी केलेल्या नाटकाच्या आठवणीनाही उजाळा मिळाला आहे. जेव्हा या मालिकेच्या सेटवर या दोघांनाही फ्री टाईम मिळतो तेव्हा ही जोडी त्यांनी केलेली नाटकं, त्याच्या तालमी याविषयी असे अनेक किस्से सहकारी कलाकारांना सांगत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER