शर्जिलला बेड्या पडतील! निश्चिंत रहा, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेची ग्वाही

- विषय शेतकरी आंदोलनाशी जोडला!

Sharjeel Usmani - Sanjay Raut

मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेत शार्जील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेले अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्य सध्या चर्चेत आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखात ‘शर्जिलला बेड्या पडतील! निश्चिंत रहा’ अशी ग्वाही शिवसेनेतर्फे (Shiv Sena) देण्यात आली मात्र, हे करत असताना त्यांनी हा विषयही शेतकरी आंदोलनाशी जोडला!

शर्जिलवर (Sharjeel Usmani) कारवाई करण्याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून फडणवीसांना उत्तर देण्यात आले. शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिंत रहा! ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झाले.

‘आजचा हिंदू समाज सडलेला, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लिम आहात हे कारण पुरेसे आहे’, असे वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शार्जील उस्मानी याने केले होते. शार्जिल उस्मानीच्या या वक्तव्याने वादंग निर्माण झाले आहे.

यावर सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, शर्जिलसारखे कित्येक किडे-मकोडे आले व गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदू समाजाला अपमानित करणे हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे. शर्जिलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय, तर पाताळात लपून बसले तरी त्याला खेचून आणण्याची हिंमत महाराष्ट्र पोलिसांत आहे हे काय श्री. फडणवीस यांना माहीत नाही? तेसुद्धा कालपर्यंत राज्यकर्ते होतेच. त्यांच्या मनात तरी महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये. शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिंत रहा! ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या, असे सामनात म्हटले आहे.

‘एल्गार’ नावाची एक टोळधाड

सामनात म्हटले आहे की, कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळले आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही. ‘एल्गार’ नावाची एक टोळधाड पुण्यात जमा केली जाते. त्या व्यासपीठावरून फक्त भडकवाभडकवीच केली जाते. नाव एल्गार, पण वाजवायच्या हिंदुत्वविरोधी पिपाण्या. तो कोणीएक शर्जिल उस्मानी तेथे आला व त्याने आपल्या देशातले हिंदुत्व कसे सडले आहे यावर प्रवचन झोडले. त्यावर भाजपने आता आरोळ्या ठोकायला सुरुवात केली आहे. हिंदुत्वासाठी रस्त्यावर येऊ असे त्यांनी जाहीर केले आहे. उस्मानी जे बरळला ते गंभीर आहे. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, असा आतडी पिळवटून टाकणारा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची ‘मन की बात’च जाहीर केलीत. शर्जिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही.

अग्रलेखात म्हटलं आहे की, हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, हा त्यांचा प्रश्न योग्यच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर नाहीच नाही, पण दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी 90 दिवसांपासून रस्त्यावर पडले आहेत. ते सर्व शेतकरी हिंदूच आहेत. त्या हिंदू, शीख शेतकऱ्यांना सन्मानाने घरी कधी पाठवणार ते सांगा. रस्त्यावरचा शेतकरी त्याच्या हक्कासाठी लढत आहे. आता त्याचे पाणी, विजेचे कनेक्शन कापले. त्याच्यासमोर खिळ्यांची बिछायत अंथरली. हा समस्त हिंदू शेतकऱ्यांचा सन्मान म्हणावा काय? या शेतकऱ्यांनी तर कोणताही गुन्हा केलेला नाही. भाजप पुढाऱ्यांनी रस्त्यावरच्या या हिंदुत्वाची थोडी फिकीर केली तर बरे होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER